Aishwarya Rai old viral video : आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. फक्त चित्रपटच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कारणांनी विविध प्रसंगी भारताचं प्रतिनिधीत्वं करणाऱ्या ऐश्वर्याचा एक मोठा चाहतावर्ग आहे. अशी ही सौंदर्यवती गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आहे.
ऐश्वर्या आणि तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्यात कथित स्वरुपात सारंकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांकडून किंवा कुटुंबाकडून यासंदर्भात अद्याप कोणतंही अधिकृत वृत्त किंवा या वृत्तांना दुजोरा देण्यात आलेला नाही. असं असलं तरीही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या दोन्ही सेलिब्रिटींमध्ये असणारा दुरावा लक्ष वेधत आहे.
कैक कार्यक्रम आणि सोहळ्य़ांसाठी त्यांचं एकत्र न येणंही अनेक चर्चांना वाव देऊन जात आहे. याचदरम्यान काही फोटो आणि व्हिडीओसुद्धा व्हायरल होत असून, यामध्ये व्हायरल होणाऱ्या जुन्या व्हिडीओ आणि फोटोंचं प्रमाण अधिक आहे. अॅशचा एक जुना व्हिडीओ आता पुन्हा समोर आला असून, त्यावेळी तो जसा चर्चेचा विषय ठरला, अगदी त्याच पद्धतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील असून, इथं ऐश्वर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं सन्मानित केलं जात असल्याचं पाहायला मिळतं. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटासाठी पुरस्कार मिळताच ऐश्वर्या तो स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आली असता त्यावेळी अनेकांनाच धक्का बसला होता.
सहसा सौंदर्यानं नजर रोखणाऱ्या ऐश्वर्यानं यावेळीही तिच्या रुपामुळं लक्ष वेधलं. पण, तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या वेदना, सुजलेले डोळे, काळानिळा पडलेला दंड अनेकांचीच चिंता वाढवून गेला. हातावर प्लास्टरवजा एक गोष्ट असलेल्या ऐश्वर्याला तिथं व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं. अखेर पुरस्कार स्वीकारल्यानंतरच या अभिनेत्रीनं आपल्याला ही दुखापत नेमकी कशी झाली यामागचं कारणंही सांगितलं होतं.
आपण घराबाहेर पडताना तिथंच पाय घसरून पडलो आणि ही दुखापत झाल्याचं तिनं सर्वांसमोरच सांगितलं. किंबहुना या अशा अवस्थेत पुरस्कार सोहळ्यासाठी का जायचं? असंही आपल्याला अनेकांनी विचारल्याचं ती म्हणाली होती. मला प्रेक्षक आणि या कलाविश्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही संधी मिळाली आणि म्हणून मी अशी इथं आलेय, असं कारण ऐश्वर्यानं त्यावेळी सांगितलं होतं.