बॉलिवूड हे फक्त आता मनोरंजनाचं साधन राहिलं नसून एक व्यवसाय झाला आहे. कित्येक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे स्टुडिओ आणि प्रोडक्शन हाऊस हे काही कुटुंबांच्या हातात आहेत. पण आता हे प्रोडक्शन हाऊसचे रुपांतर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये झालं आहे. यामुळे अनेक बॉलिवूड कुटुंबांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. यामधील सर्वात श्रीमंत कुटुंबाची संपत्ती तब्बल 10 हजार कोटी इतकी आहे.
Hurun India Rich List 2024 सर्व क्षेत्रातील सर्वात श्रीमंत भारतीयांची माहिती दिली आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानींसारख्या अब्जाधीशांनी या यादीत अव्वल स्थान पटकावले असताना, मनोरंजनसृष्टीतील अनेक नावांचाही यात समावेश आहे. यामध्ये टी-सीरीज ग्रुप ऑफ कंपनीचे मालक भूषण कुमार यांचं कुटुंब आघाडीवर आहे. हुरुनने कुटुंबाची एकत्रित संपत्ती तब्बल 10 हजार कोटी ($1.2 अब्ज) असल्याची माहिती दिली आहे. म्हणजेच कुमार हे आता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत घराणे बनले आहे. एकेकाळी कपूर आणि चोप्रा कुटुंब या स्थानी होतं.
कुमार यांनी सर्वात श्रीमंत कुटुंबाचा मान मिळवण्याआधी चोप्रा कुटुंब या स्थानी होतं. यश राज फिल्म्सचे आणि बीआर फिल्म्सचे मालक चोप्रा कुटुंब सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखलंजात होतं. आदित्य चोप्राच्या कुटुंबाची अंदाजे निव्वळ संपत्ती 8000 कोटी आहे, जी T-Series च्या कुमार कुटुंबापेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे, शाहरुख खानच्या कुटुंबाची संपत्ती 7500 कोटी आहे. यात साहजिकपणे शाहरुखचा वाटा मोठा आहे. सलमान खान आणि त्याच्या भावांची एकूण संपत्ती 3500 कोटी आहे. दक्षिणेकडील कुटुंबे, जसे की अक्किनेनिस किंवा मेगा कुटुंब (अल्लू-कोनिडेला कुटुंब), सलमानच्या कुटुंबापेक्षा जास्त श्रीमंत आहेत.
Hurun India Rich List ने कुमार कुटुंबात नेमकी कोणाकडे किती संपत्ती आहे याची माहिती दिलेली नाही. मात्र यातील सर्वाधिक वाटा भूषण कुमार यांचा आहे. त्याच्या बहिणी तुलसी कुमार आणि खुशाली कुमार यांची संपत्ती अनुक्रमे 250 कोटी आणि 100 कोटी आहे. भूषणचे काका, किशन कुमार, जे टी-सीरीजचे सह-मालक आहेत, ते कुटुंबाच्या उर्वरित संपत्तीमध्ये योगदान देतात.
कुमार कुटुंबाने अत्यंत माफक साधनांनी सुरुवात केली असल्याने सध्या ते यशाच्या शिखरावर आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. गुलशन कुमार (भूषणचे वडील आणि किशन यांचे भाऊ) दिल्लीत फळविक्रेते होते. 70 च्या दशकात त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी संगीत कॅसेट विकण्याचे दुकान घेतल्यावर त्याच्या करिअरचा मार्ग बदलला. तिथून, त्यांनी स्वतःचे रेकॉर्ड लेबल, सुपर कॅसेट सुरू करण्याचं कौशल्य मिळवलं. यानंतर टी-सीरिज कंपनी सुरु झाली. आज, कंपनीकडे एक भव्य मूव्ही स्टुडिओ देखील आहे, जो देशातील सर्वात मोठा आहे.