Prajakta Mali Viral Video: आज संपूर्ण जगभरात योग दिन (International Yoga Day) साजरा केला जात आहे. भारतात सर्वसामान्यांनसह लष्कर जवानांपर्यंत सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झाले असून, देशभरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बॉलिवूडसह (Bollywood) मराठी सेलिब्रिटीही योगदिन साजरा करत असून हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळीही (Prajakta Mali) यात सहभागी झाली होती. प्राजक्ता माळीने 108 सूर्यनमस्कार घालत योगदिन साजरा केला. तिने याचं इन्स्टाग्रामला (Instagram) लाईव्हही केलं.
इन्स्टाग्राम लाईव्ह करण्याआधी प्राजक्ता माळीने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने आपल्या फॉलोअर्सनाही आपल्यासह सूर्यनमस्कार घालण्याचं आवाहन केलं. सकाळी 7 वाजता प्राजक्ता माळी लाईव्ह होती. यावेळी तिने आपण 15 दिवसांपूर्वीच सर्वांना सूर्यनमस्कार घालण्यासाठी आवाहन करणार होतो असं सांगितलं. पण ते का केलं नाही यामागील कारणाचाही खुलासा केला. तसंच आपणही एका वर्षाने इतके सूर्यनमस्कार घालत असल्याने धाकधूक वाटत असल्याचं सांगितलं. याशिवाय 108 च सूर्यनमस्कार का? यामागील कारणाचा खुलासा केला.
प्राजक्ता माळीने सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा देत लाईव्हला सुरुवात केली. "आपण 108 सूर्यनमस्कार घालणार आहोत. सर्वांनी पाणी आणि साखर जवळ ठेवा. गरगरायला होऊ शकतं त्यामुळे त्याची गरज भासू शकते. एसी आणि पंखा बंद करा. खूप घाम येणार आहे, तो येऊ देत. पण एसी किंवा पंखा लावून व्यायाम करायचा नसतो,"असं प्राजक्ता माळीने सांगितलं.
"योगदिन येत असल्याने व्यायाम करायला घ्या, सूर्यमस्कार घाला असं मी सांगणार होते. पण 15 दिवस आधी कशाला सांगायचा असा विचार आला. योगदिन आहे म्हणून जागे होऊ नका. 12 नमस्कार हा रोजच्या दिनक्रामचा भाग बनवा. आयुष्य आनंद होईल आणि हसत राहाल. हा सर्वात चांगला व्यायामप्रकार आहे. त्याचे फायदे मला माहिती असून मी अनुभव घेत आहे," असंही तिने यावेळी सांगितलं.
"भारतीय शरिरासाठी भारतीय हवामानानुसार नखापासून डोक्यापर्यंत सगळ्यांना योग्य फायदा होईल अशा पद्धतीने हे तयार करण्यात आलं आहे. तुम्ही रोज योगाने दिवसाची सुरुवात करत जा," असं आवाहन यावेळी तिने केलं. 108 आकड्याला भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे त्यामुळे त्याची निवड केली आहे असं ती म्हणाले.
दरम्यान एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना तिने, आंघोळ करुन व्यायम केल्याने फायदा होतो आणि व्यायामानंतर पुन्हा आंघोळ करा असा सल्ला दिला. तसंच मला धाकधूक वाटत आहे. मी एका वर्षांनी 108 सूर्यनमस्कार घालत आहे असं सांगितलं. दरम्यान एकीने फरसाणचा उल्लेख केला असता, सूर्यनस्कार झाल्यावर फरसणा खाऊ शकता असं तिने मिश्कीलपणे सांगितलं. तसंच म्हातारपणात जागे होऊ नका, जितक्या आधी व्यायाम सुरु कराल तितका फायदा होईल असं आवाहन केलं.