Manoj Muntashir Statement On Lord Hanuman: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटासंदर्भातील वाद थांबण्याचं नाव घेत नसताच आता यात आणखीन एका वादाची भर पडली आहे. 'आदिपुरुष' चित्रपटाचे लेखक तसेच संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी हनुमानाबद्दल (Lord Hanuman) केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हनुमानाबद्दल हे विधान केलं आहे. या विधानावरुन आता केसरी चित्रपटातील तेरी मिट्टी फेम मनोज मुंतशीर यांच्याविरोधात टिकेची झोड उठत असल्याचं दिसत आहे.
मनोज मुंतशीर यांनी 'आजतक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "बजरंगबली भगवान नहीं है, भक्त है" असं म्हटलं आहे. म्हणजेच हनुमान हा देव नसून केवळ भक्त असल्याचं विधान मनोज मुंतशीर यांनी केलं. मनोज मुंतशीर यांनी 'आदिपुरुष'मधील संवादांसंदर्भात आपली भूमिका मांडताना मागील काही दिवसांमध्ये अनेक मुलाखती दिल्या आहेत. अशाच एका मुलाखतीमध्ये त्यांनी हनुमानाबद्दल केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाल्याने आता मुंतशीर यांनी मुलाखती देऊन वायफळ बडबड करु नये असं अनेकांनी म्हटलं आहे.
"तो श्रीरामांप्रमाणे बोलत नाहीत. बजरंगबली दर्शनिक पद्धतीने संवाद साधत नाही. बजरंगबली देव नाही भक्त आहे. आपण त्यांना नंतर देव बनवलं कारण त्यांच्या भक्तीमध्ये तशी शक्ती होती," असा युक्तीवाद मुंतशीर यांनी आपली बाजू मांडता केला. "कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की तो जलेगी भी तेरे बाप की," या संवादासंदर्भात स्पष्टीकरण देताना मुंतशीर यांनी हे विधान केलं.
मात्र हनुमान देव नव्हता पण त्याच्या भक्तीमुळे आपण त्याला देवाचा दर्जा दिल्याचं मुंतशीर यांचं विधान अनेकांना आवडलेलं नाही. त्यांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे. हे म्हणत आहेत की बजरंगबली देवाचा अवतार नव्हता. अरे भावा हनुमान भगवान शिवाचा अवतार होता. तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तुमच्या या विधानांसाठी तुम्हाला पाप लागेल, अशा शब्दांमध्ये स्वाती नावाच्या एका युजरने या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करत मनोज मुंतशीर यांच्यावर निशाणा साधला आहे. मी मनोज मुंतशीर यांना फार फॉलो करायचो पण हा युक्तीवाद ऐकून यापुढे त्यांना फॉलो करणार नाही, असं म्हटलं आहे. दरवेळी हे काहीतरी बोलतात आणि अजून अडचणीत अडकतात असा टोला अन्य एकाने लगावला आहे. अशा व्यक्तींना वृत्तवाहिन्यांनी मुलाखतींसाठी बोलवू नये असं अन्य एकाने म्हटलं आहे.
2 दिवसांपूर्वीच मनोज मुंतशीर यांनी ट्वीटरवरुन 'आदिपुरुष'मधील संवादांवरुन वाद झाल्यानंतर वादग्रस्त संवादांमध्ये बदल करण्याचा निर्णय दिग्दर्शक, निर्माते आणि आम्ही एकत्र मिळून घेतला असल्याचं म्हटलं होतं. लोकांच्या भावनाच आमच्यासाठी महत्त्वाच्या असल्याचं म्हणत हे संवाद बदलणार आहोत असं 'आदिपुरुष'च्या लेखकाने म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा हनुमानासंदर्भात वादग्रस्त विधान करुन त्यांनी लोकांच्या भावना दुखावल्याचं दिसत आहे.