'मुलाचे नाव जहांगीर असलं तरी तो वेगळे संस्कार करतोय का?' पुष्कर श्रोत्रीचा सवाल, म्हणाला 'खोटी नावं, अकाऊंट्स...'

अभिनेता चिन्मय मांडलेकरने यापुढे कधीच छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चाहत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांनाही धक्का बसला.

नम्रता पाटील | Updated: Apr 24, 2024, 11:52 AM IST
'मुलाचे नाव जहांगीर असलं तरी तो वेगळे संस्कार करतोय का?' पुष्कर श्रोत्रीचा सवाल, म्हणाला 'खोटी नावं, अकाऊंट्स...' title=

Pushkar Shrotri on Chinmay Mandlekar Trolling : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत उत्तम भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने यापुढे कधीच छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चाहत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांनाही धक्का बसला. त्याचा मुलगा जहांगीरच्या नावामुळे होणारे ट्रोलिंगमुळे चिन्मयने स्वत: हा निर्णय जाहीर केला. यावर विविध कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता पुष्कर श्रोत्रीने याबद्दल जाहीर मत मांडलं आहे. 

पुष्कर श्रोत्रीने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरुन होणारे ट्रोलिंग आणि त्याने घेतलेला निर्णय यावर मत मांडलं. "चिन्मय मांडलेकरने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं, म्हणून तो त्याच्या मुलावर वेगळे संस्कार करतोय का? तो भारतीय संस्कृतीतील संस्कार करतोय. आजची परिस्थिती कशी आहे, याचा सर्व विचार करुनच तो त्याचे संगोपन करतोय. स्वत:च्या मुलाला वाईट गोष्टी करण्यापासून परावृत्त करतोय, त्याला चांगल्याच गोष्टी शिकवतोय. मग, नावाने काय फरक पडतो?", असा प्रश्न पुष्करने विचारला आहे. 

आणखी वाचा : 'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप

यापुढे पुष्कर म्हणाला, "जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मुलाच्या नावावरुन त्याला ट्रोल करणार असला, तर तुम्हाला त्यामागचा इतिहास माहितीये का? चिन्मयने जहांगीर हे नाव का ठेवलं, हे त्याने फार पूर्वीच सांगितलं आहे. तुम्ही इतिहास चाचपडून बघा आणि तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल, तर तुमचा खरा चेहरा घेऊन समोर या. तुम्ही खोटी नावं, खोटी अकाऊंट्स बनवून ट्रोल करणार…तुम्हाला आम्ही किती आणि का महत्त्व द्यायचं?" असेही पुष्करने म्हटले आहे. पुष्कर श्रोत्रीचा हा व्हिडीओ मराठी बातमी वाला या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं? 

अभिनेता चिन्मय मांडलेकरने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीनंतर चिन्मय मांडलेकरसह त्याच्या कुटुंबाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकरने त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. या नावामुळेच ते पुन्हा ट्रोल झाले. वाढत्या ट्रोलिंगनंतर चिन्मयची पत्नी नेहाने एका व्हिडीओद्वारे ट्रोलर्सची तोंड बंद केली होती. मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते की, आम्ही आमच्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ असून सुद्धा स्क्रीन महाराजांची भूमिका साकारण्याचं धाडस केलं. आम्हाला क्षमा करा. आमची चूक झाली. आम्हाला असं वाटलेलं की, महाराज हे एका नटाच्या नावाच्या पलीकडे आहेत. त्यांचं काम, त्यांचं चरित्र खूप मोठं आहे. आम्ही चुकलो, आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचवता नाही आलं, असे नेहा मांडलेकरने म्हटले होते. 

आणखी वाचा : 'स्वत:च्या मुलाला मुघलांचे नाव देणारा नाच्या', 'ती' कमेंट वाचताच चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा संताप, म्हणाली 'जहांगीरच्या मुलाचं नाव आम्ही...'

त्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्मय मांडलेकरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने यापुढे कधीच छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही, असे म्हटले होते. चिन्मयने ‘मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही, या भूमिकेची रजा घेतो’ असं या व्हिडीओत जाहीररित्या सांगितले होते. अनेकांनी त्याला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. पण अद्याप चिन्मयने याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.