Deepa Parab Receive Best Actress Award : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून अंकुश चौधरीकडे पाहिले जाते. दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर अंकुश चौधरीने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. अंकुश चौधरीसोबतच त्याची पत्नी दीपा परबने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेद्वारे तिने सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण केले. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे ती घराघरात पोहोचली. आता अंकुशची पत्नी दीपाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
अंकुश चौधरीची पत्नी दीपा परब ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘तू चाल पुढं’ मालिकेच्या माध्यमातून दीपा ही घराघरात पोहोचली. दीपा परब ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता दीपाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिला जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.
झी चित्र गौरव २०२४ : सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (बाई पण भारी देवा). झीच नेहमीच माझ्या आयुष्यात खूप स्पेशल स्थान राहिलेलं आहे. त्यामुळे हा पुरस्कार स्विकारताना विशेष आनंद होतो आहे, असे दीपा परबने म्हटले आहे. दीपा परबच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत. धनश्री काडगावकरने अभिनंदन असं म्हणत यावर कमेंट केली आहे. तर काहींनी आम्हाला तुझा खूप खूप अभिमान वाटतो, असे म्हटले आहे.
दरम्यान दीपाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट प्रदर्शित झाला. यात तिने चारु हे पात्र साकारले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 5 कोटी रुपये खर्च करण्यात आला. पण या चित्रपटाने निर्मितीच्या तिप्पट तब्बल 90 कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात सुकन्या कुलकर्णी-मोने, दीपा परब, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि रोहिणी हट्टंगडी या अभिनेत्रींची मुख्य भूमिका आहे. सहा बहिणींचे नाते आणि त्यांचे भावनिक विश्व यावर हा चित्रपट आधारित आहे. यंदा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे यंदा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील सहा अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.