कॅन्सरशी झुंज देतोय 'हा' प्रसिद्ध बालकलाकार, हातात फक्त शेवटचे 40 दिवस; म्हणतोय 'सचिन पिळगावकरांना...'

ज्युनिअर मेहमूद सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. त्यांना यकृत आणि फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचं निदान झाले आहे. त्यांच्याकडे आता फक्त शेवटचे 40 दिवस राहिल्याचं जवळच्या मित्राने सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 5, 2023, 07:37 PM IST
कॅन्सरशी झुंज देतोय 'हा' प्रसिद्ध बालकलाकार, हातात फक्त शेवटचे 40 दिवस; म्हणतोय 'सचिन पिळगावकरांना...' title=

ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर मेहमूद कर्करोगाशी झुंज देत आहेत. मेहमूद सध्या कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर आहेत. 67 वर्षीय अभिनेत्याला नोव्हेंबरमध्ये कॅन्सरचं निदान झालं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्युनियर मेहमूद यांच्याकडे आता फक्त शेवटचे 40 दिवस उरले असल्याचं त्यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितलं आहे. दरम्यान, आपल्या या शेवटच्या दिवसात आपले जिगरी मित्र जितेंद्र आणि बालमित्र सचिन पिळगावकर यांना भेटण्याची त्यांची इच्छा असल्याचंही मित्राने म्हटलं आहे. नुकतंच जॉनी लिव्हरने रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली होती. 

ज्युनियर मेहमूद यांनी ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यासह अनेक चित्रपटात काम केलं आहे. यामुळेच त्यांच्यात खास मैत्री आहे. सलाम काजी आणि ज्युनियर मेहमूद हे फार चांगले मित्र असून गेल्या 15 वर्षांपासून एकत्र आहेत. सलाम काजी यांनी सांगितलं की, ज्युनियर मेहमूद यांना जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांची फार आठवण येत आहे. त्यांनी सचिन पिळगावकरांना मेसेजही केला आहे, पण अद्याप उत्तर आलेलं नाही. सचिन पिळगावकरांनी ज्युनियर मेहमूद यांना व्हिडीओ कॉल केला होता, पण वैयक्तिक भेट अद्याप झालेली नाही. 

सचिन पिळगावकरांच्या उत्तराची वाट

सलाम काजी यांनी सांगितलं की, "ज्युनियर मेहमूद यांनी मला सांगितलं की, जितूजी आले नाहीत, मला त्यांना भेटायचं आहे. त्यांना सचिन पिळगावकरांनाही भेटायचं आहे. मला वाटतं त्यांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. मी सचिन यांना मेसेज केला आहे, त्यांच्या उत्तराची सध्या वाट पाहत आहे".

2 महिन्यांपासून आजारी, अशाप्रकारे झालं कॅन्सरचं निदान

सलाम काजी यांनी सांगितलं की, “ते 2 महिन्यांपासून आजारी होते. सुरुवातीला आम्हाला वाटलं की त्यांना काही किरकोळ समस्या आहे. पण त्यानंतर अचानक त्यांचं वजन कमी होऊ लागलं. जेव्हा वैद्यकीय अहवाल आले तेव्हा त्यात यकृत आणि फुफ्फुसात कर्करोग आणि आतड्यात एक गाठ असल्याचं समोर आलं. त्यांना कावीळही झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण डॉक्टरांनी हा कॅन्सर चौथ्या टप्प्याचा असल्याचं सांगितलं आहे.”

सलाम काजी यांनी ज्युनियर मेहमूद यांच्याकडे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त 40 दिवस असल्याची माहिती दिली आहे. तसंच त्यांना कोणत्याही आर्थिक मदतीची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र तरीही जॉनी लिव्हर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 

ज्युनियर मेहमूद हे कटी पतंग, ब्रह्मचारी, मेरा नाम जोकर आणि परवरिश यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत.

ज्युनियर मेहमूद यांनी वेगवेगळ्या भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभ्यासात रस नसल्याने आपण अभियनयाकडे वळालो असं त्यांनी एकदा सांगितलं होतं. रतन भट्टाचार्य यांच्या 'सुहागरात' चित्रपटात मेहमूद साहब यांच्या मेहुण्याची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली.