Vidya Balan In Trouble: भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमधील शेवटच्या कसोटीमधून स्वत:ला वगळण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सातत्यपूर्ण कामगिरी करता येत नसल्याने आपण स्वत:हून संघाबाहेर बसल्याचं रोहितने स्पष्ट केलं आहे. अनेकांनी रोहितच्या या कृतीचं कौतुक केलं असून त्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा समावेश आहे. सर्वात आधी अभिनेता दिग्दर्शक फराहन अख्तरने रोहितचं कौतुक केलं. त्यानंतर अभिनेत्री विद्या बालन रोहितच्या समर्थनार्थ समोर आली. विद्याने रोहितच्या नेतृत्व गुणांचं कौतुक केलं. एकीकडे विद्याचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे रोहितच्या समर्थनार्थ पुढे आल्याने विद्याच अडचणीत सापडल्याचं दिसत आहे.
विद्याने रोहितसाठी केलेली पोस्ट पाहून अनेकांनी या अभिनेत्रीने पीआरचा फॉर्वडेड व्हॉट्सअप मेसेज तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याचं म्हटलं आहे. विद्यानेही नंतर ही पोस्ट डिलीट केली आहे. विद्याने तिच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन पोस्ट केली होती. त्यामध्ये तिने, "रोहित शर्मा एक सुपरस्टार आहे! थोडं थांबून श्वास घेण्यासाठीही हिंमत लागते. तुला अधिक बळ मिळो... तुझा अभिमान वाटतो," असं म्हणत रोहित शर्माचं ट्विटर हॅण्डल टॅग केलेलं.
मात्र रेडीटवरील युझर्सच्या दाव्यानुसार, विद्याने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डवलवरही रोहित शर्मासंदर्भात एक पोस्ट केलेली. मात्र ही पोस्ट करताना विद्याने चुकून तिच्या व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट पोस्ट केलेला. या स्क्रीनशॉटमध्ये विद्याने शेअर केलेली ट्विटरवरील पोस्ट ही एका पीआरने शेअर केली होती. विद्याने चुकून पीआरने पाठवलेल्या व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला. विद्याने तिची इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केली असली तरी तिच्या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.
या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. "...आणि मला वाटलं की फरहानने त्याच्या क्रिकेट प्रेमातून ही पोस्ट केली होती. मला वाटतं त्याची पोस्टही पीआरची होती," असं एकाने म्हटलं आहे. "फरहानची पोस्ट सुद्धा संशयास्पद होती. तो रोहितला साधं फॉलोही करत नाही," असं अन्य एकाने म्हटलंय. केवळ फरहान नाही तर विद्यालाही अनेकांनी ट्रोल केलं आहे. "तू आधी रोहितला इन्स्टाग्रामवर फॉलो तर कर आणि मग त्याला पाठिंबा दे," असं म्हटलं आहे. "आता मूळ प्रवाहाबाहेर गेलेल्या कलाकारांकडून क्रिकेटर्सचा पीआर केला जात आहे तर," असा टोला लगावला आहे.
विद्या बालन नुकतीच भूलभुलैय्या-3 मध्ये झळकली होती. या चित्रपटाने जगभरामध्ये 423 कोटी रुपयांची कमाई केली आहे.