'मी स्वत: दारु पीत असल्याने त्याला..'; बापाचा 'तो' Video पाहून बॉबी देओल ढसाढसा रडला

Bobby Deol Sunny Deol Crying: "आम्ही दोघेही फार भावनिक आहोत. ही फार मोठी अडचण आहे," असं स्वत:ला सावरताना सनीने म्हटलं आणि आपले डोळे पुसले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 24, 2023, 12:43 PM IST
'मी स्वत: दारु पीत असल्याने त्याला..'; बापाचा 'तो' Video पाहून बॉबी देओल ढसाढसा रडला title=
वडिलांचा मेसेज पाहून दोघेही भावूक झाले

Bobby Deol Sunny Deol Crying: अभिनेता सनी देओल आणि त्याचा भाऊ बॉली देओल यांना त्यांच्या वडिलांचा म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र यांनी पाठवलेला एक मेसेज पाहून अश्रू अनावर झाले. कॉफी विथ करणच्या 8 व्या पर्वातील दुसऱ्या भागामध्ये हे दोन्ही भाऊ सहभागी झाले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडीओ या दोघांना दाखवण्यात आला. धर्मेंद्र यांनी आपल्या दोन्ही मुलांबद्दल भरभरुन बोलताना हलक्याफुलक्या स्वरुपात भावनिक पद्धतीने मांडलेल्या भावना ऐकून दोन्ही भावांना रडू कोसळलं.

अजून समजूतदार होणं गरजेचं

"मुलगा कसाही असो तो बापासमोर दबूनच राहतो. मात्र बापापासून दूर झाल्यानंतर अगदी वाघ होतो," असं म्हणत धर्मेंद्र यांनी आपल्या व्हिडीओ मेसेजला सुरुवात केली. "सनीच्या आत एक लहान मुलं दडलेलं आहे जे आता समजूतदार झालं आहे. मात्र त्याने अजून समजूतदार होणं गरजेचं आहे," असं धर्मेंद्र यांनी सनी देओल हा 'योद्धा आहे' असं नमूद करत म्हटलं. 

बॉबी फार चालू आहे

त्यानंतर धर्मेंद्र यांनी बॉबी देओलच्या स्वभावाबद्दल सांगताना त्याला चालू म्हटल्याने बॉबीला आश्चर्याचा धक्का बसला. "बॉबी सर्वांचा लाडका होता. नेहमी जे धाकटे असतात त्यांच्यावर घरातील मंडळी फार प्रेम करतात. मात्र तो म्हणतो की तुम्ही सनीवर जास्त प्रेम करायचे आणि माझ्यावर कमी. मात्र माझं त्याच्यावर प्रेम आहे. आम्हा सर्वांचं त्याच्यावर फार प्रेम आहे," असं धर्मेंद्र म्हणाले.

मीच जास्त मद्यपान करत असल्याने...

"दोघेही फार हळवे आहेत. बॉबी काही गोष्टी लपवतो. सनीचं सारं काही समजतं. बॉबी थोडा चालू असून तो सगळं सांगत नाही. मी त्याच्यापेक्षा अधिक सुट्टा प्यायचो, मद्यप्राशन करायचो. मी स्वत: फार मद्यपान करत असल्याने त्याला कधी तू दारु पित जाऊ नकोस असं म्हणालो नाही. मात्र मी आजही त्याला हेच सांगेन," असं धर्मेंद्र म्हणाले.

तुमचा फार अभिमान वाटतो

दोन्ही मुलांनी जे काही कमवलं आहे त्याचा मला फार अभिमान वाटतो असंही धर्मेंद्र म्हणाले. तसेच त्यांच्या कमाईपेक्षा ते फार निर्मळ आणि चांगल्या मनाचे आहेत हे मला अधिक भावतं, असंही धर्मेंद्र म्हणाले. "सनी, बॉबी मला तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही चांगल्या मनाचे आहात. या इंडस्ट्रीचे चढ-उतार तुम्हाला समजतात. त्यामुळे तुमचा प्रवास सुरु ठेवा. हे चढ-उतार येत राहणार. बाप तर कायम बोअर करत असतो. पण तो त्याचा हक्क असतो. तुम्हाला म्हणूनच मी हक्काने शुभेच्छा देतोय," अशं धर्मेंद्र म्हणाले. 

मद्याच्या आहारी गेलेले बॉबी

धर्मेंद्र यांचा हा मेसेज ऐकून दोन्ही भाऊ रडायला लागले. "आम्ही दोघेही फार भावनिक आहोत. ही फार मोठी अडचण आहे," असं स्वत:ला सावरताना सनीने करण जोहरला सांगितलं. त्यावर करण जोहरने यात वाईट वाटण्यासारखं, लाज वाटण्यासारखं काहीच नाही असं म्हणत दोघांना धीर दिला. याच कार्यक्रमामध्ये बॉबी देओलने करिअरमधील वाईट कालावधीमध्ये आपल्याला मद्याचं व्यसन लागलं होतं अशी कबुली दिलेली. मात्र मुलाने समजावल्यानंतर आपण पुन्हा मद्यापासून दूर गेलो असं बॉबीने सांगितलं.