अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट? विराट कोहलीसोबतचा फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यादरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक फोटो व्हायरल झाला आहे.  

शिवराज यादव | Updated: Dec 15, 2023, 04:21 PM IST
अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट? विराट कोहलीसोबतचा फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय? title=

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील अनेक काळापासून स्पॉटलाइटपासून दूर आहे. शाहरुख खानसोबतच्या 'झिरो' चित्रपटात ती शेवटची दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला होता. यादरम्यान अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून विराट आणि अनुष्काचे काही फोटोही या दाव्यासह व्हायरल होत आहेत. यामध्ये अनुष्काच्या कपड्यांवरुन ती प्रेग्नंट असल्याचे अंदाज लावले जात आहेत. पण विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मात्र यावर काहीही भाष्य केलेलं नाही. 

या चर्चांदरम्यान अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक नवा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकत्र दिसत आहेत. तसंच अनुष्काचा बेबी बंप दिसत असून तिने त्यावर हात ठेवला आहे. फोटोत अनुष्काने सोनेरी रंगाची साडी नेसली असून विराटही पारंपारिक कपड्यांमध्ये दिसत आहे. 

पण जर तुम्ही नीट पाहिलं तर हा फोटो एडिट केला असल्याचं स्पष्ट होत आहे. अनुष्काने 2018 मध्ये हीच साडी नेसली होती. दिवाळीमध्ये नेसलेल्या या साडीतील फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केला होता. विराट आणि अनुष्काने बाल्कनीत उभं राहून हा फोटो काढला होता. तसंच अनुष्काचा भाऊ करनेश शर्मा यानेही 2018 मध्ये आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत त्यांचे याच कपड्यांमधील फोटो शेअर केले होते. 

त्यामुळे त्यांचा हा फोटो फोटोशॉप करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना एक मुलगी आहे. वाल्मिकाचा जन्म जानेवारी 2021 मध्ये झाला. विराट आणि अनुष्का हे भारतातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी आहेत. दरम्यान, अनुष्का आता झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात दिसणार आहेत. प्रोसित रॉय या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.