Daler Mehndi Slams Diljit Dosanjh: दिलजीत दोसांज हा या वर्षी फारच चर्चेत आहे. अगदी सध्या सुरु असलेले म्युझिक कॉन्सर्ट असो किंवा चित्रपट असो 2024 हे वर्ष दिलजीतसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी फार खास राहिलं आहे. यंदाच्या वर्षी दिलजीतने पंजाबी गायक अमर सिंग चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित चमकीला चित्रपटामधून चाहत्यांची मनं जिंकली. त्याचप्रमाणे सध्या सुरु असलेल्या दिल-ल्युमिनिटी कॉन्सर्टही चांगलेच चर्चेत आहेत. दिलजीतला संगीत श्रेत्रात त्याच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या दिलेर मेहंदीने सुनावलं आहे. दिलजीत ज्या पद्धतीने स्वत:ला इतरांसमोर सादर करतो त्यावरुन दिलेर मेहंदीने नाराजी व्यक्त केली आहे. अमर सिंग चमकीला यांच्या भूमिकेसाठी केस कापल्यानंतरही तो कशाप्रकारे स्वत:ला धार्मिक म्हणून घेण्याच्या दिलजीतच्या कृतीबद्दल आपल्याला चीड येते असं दिलेर मेहंदीने म्हटलं आहे.
'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलेर मेहंदीने, दिलजीत दोसांजच्या यशाबद्दल भाष्य केलं. यावेळेस या ज्येष्ठ गायकाने कशाप्रकारे दिलजीत दोसांजने स्वत:ला पारंपारिक पंजाबी गायक असलेल्या अमर सिंग चमकीला यांच्या भूमिकेत कसं सादर केलं याबद्दल भाष्य केलं. यासंदर्भात बोलताना बोलताना दिलेर मेहंदीने, दिलजीत स्वत:ला कट्टर पंजाबी, धार्मिक असल्याचं का दर्शवतो? आपण आपली पगडी काढणार नाही अशी भूमिका त्याने यापूर्वी अनेकदा घेतली आहे. मात्र त्याने 'चमकीला' चित्रपटासाठी स्वत:चे केस कापले. हा विरोधाभास का? असा सवाल दिलेर मेहंदीने उपस्थित केला आहे. आपले भविष्यातील प्रकल्प कितीही महत्त्वाचे असले तरी आपण असं काही करणार नाही, असंही दिलेर मेहंदीने स्पष्टपणे सांगितलं.
"मला कळत नाही तो अनेकदा म्हणतो की मी माझी पगडी कधीच काढणार नाही. तो स्वत:ला पंजाबी म्हणून सगळीकडे पुढे करतो. मग त्याने चमकीला चित्रपटासाठी केस का कापले, हे मला कळलं नाही. त्याने असं करायला नको होतं. माझा स्वत:चा एक चित्रपट आगामी काळात येत आहे मात्र मी त्यात माझी पगडी कायम ठेवली आहे. मी स्वत: असं कधीही करणार नाही," असं म्हणत दिलेर मेहंदीने आपला संताप व्यक्त केला आहे.
याच मुलाखतीमध्ये अमर सिंग चमकीला यांची गाणी आपल्याला आवडायची पण कधीच आपल्याला आपल्या घरच्यांनी ती गाऊ दिली नाही, असंही दिलेर मेहंदी यांनी स्पष्ट केलं. अमर सिंग चमकीला यांच्या गाण्यांना दोन अर्थ असायचे म्हणूनही त्यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. 1988 साली गोळ्या घालून अज्ञातांनी अमर सिंग चमकीला यांची हत्या केली.