मुंबई : कॅनेडियन अभिनेत्री आणि मॉडेल स्टेफनी शेर्कने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्टेफनी शेर्क ४३ वर्षांची होती. लॉस एंजेलिसमधील काउंटी मेडिकल परिक्षक-तपासकांनी स्टेफनीने आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे. 'ईआनलाइन डॉट कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, मेंदूमध्ये ऑक्सिजनची कमी, पाण्यात डूबल्याने आणि गुदमरण्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शेर्कचे पती आणि अभिनेता डेमियन बिचिरने इंन्स्टाग्रामवरुन आपल्या पत्नीच्या मृत्यूची माहिती दिली.
इंन्स्टाग्रामवरुन डेमियन बिचिरने स्टेफनी शेर्कचा एक फोटो शेअर करत भावनात्मक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने २० एप्रिल २०१९ रोजी स्टेफनी शेर्कचं निधन झाल्याचं सांगितलं. 'आमच्यासाठी ही वेळ अतिशय कठीण आणि दुख:द आहे. हे दुख: पचवण्यासाठी किती वेळ लागेल सांगता येत नाही. स्टेफनी अतिशय सुंदर, परोपकारी होती. तिच्या प्रतिभाशाली गोष्टींची नेहमी आठवण होत राहील. शेवटपर्यंत ती आमच्या सर्वाच्या हृदयात राहणार' असल्याचं डेमियन बिचिरने म्हटलंय.
स्टेफनी शेर्क आणि डेमियन बिचिरने २०१० साली त्यांच्या नात्याची सुरुवात केली होती. २०१६ साली बिचिर लिखित आणि दिग्दर्शित एका लव्ह साँगमध्ये त्यांनी अभिनय केला होता. सप्टेंबर २०१८ साली बिचिरच्या 'द नन' चित्रपटाच्या प्रीमियरला दोघांना एकत्र पाहण्यात आलं होतं.