"माझी तेवढी लायकी नाही," म्हणणाऱ्या अरजीत सिंगला सोनू निगमने दिलं उत्तर, म्हणाला "सर्व क्रेडिट..."

Sonu Nigam on Arijit Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरजीत सिंगचा (Arijit Singh) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत अरजीत सिंग सोनू निगमची (Sonu Nigam) माफी मागताना दिसत आहे. यानंतर आता सोनू निगमनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 23, 2023, 04:37 PM IST
"माझी तेवढी लायकी नाही," म्हणणाऱ्या अरजीत सिंगला सोनू निगमने दिलं उत्तर, म्हणाला "सर्व क्रेडिट..." title=

Sonu Nigam on Arijit Singh: बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या गायकांमध्ये अरजीत सिंग (Arijit Singh) हे नाव सध्या प्रामुख्याने घेतलं जातं. आपला गोड आवाज आणि तितकाच नम्र स्वभाव यामुळे अरजीत सिंगचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. अरजीत सिंगने गेल्या काही वर्षात बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली असून, मनोरंजन विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयपीएलमध्ये जेव्हा अरजीत सिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) पाया पडला होता तेव्हा त्याने आपण इतरांपेक्षा वेगळे का आहोत आणि फक्त गायक नव्हे तर माणूस म्हणूनही मोठे असल्याचं दाखवून दिलं होतं. त्याचा धोनीच्या पाया पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यादरम्यान अरजीत सिंगचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा रंगली आहे. 

अरजीत सिंगने मागितली सोनू निगमची माफी

अरजीत सिंगप्रमाणे सोनू निगम (Sonu Nigam) हेदेखील गायकांमध्ये मोठं नाव आहे. दोघांनीही संघर्ष करत यश मिळवलं असून आपलं स्थान कायम केलं आहे. ज्याप्रमाणे अरजीत सिंग वेगवेगळ्या पठडीतील गाण्यांसाठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे सोनू निगमने प्रत्येक प्रकारची गाणी गायली आहेत. 

नुकतंच एका कॉन्सर्टमध्ये अरजीत सिंगने परफॉर्म केलं. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी अरजीत सिंगला 'साथिया' चित्रपटातील गाणं गाण्याची विनंती केली. हे मूळ गाणं सोनू निगमने गायलं आहे. त्यामुळे अरजीत सिंगने गाणं गाण्याआधी सोनू निगमची माफी मागितली. अरजीत सिंग म्हणाला की "सोनू निगमचं गाणं आहे. कृपया मला माफ करा".

सोनू निगमच्या चाहत्यांनी तयार केलेल्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट  करताना त्याने लिहिलं आहे की, अरजीत सिंगने सोनू निगमबद्दल जे म्हटलं आहे ते पाहून तुमच्या मनात दोघांबद्दल आदर वाढेल. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोनू निगमनेही या व्हिडीओची दखल घेतली असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

"ही अरिजितची नम्रता आणि प्रेम आहे. यात माझं कोणतंही श्रेय नाही. मी त्याच्यावर प्रेम करतो," असं सोनू निगमने म्हटलं आहे. 

अरजीत सिंगने आतापर्यंत 150 गाणी गायली असून 50 हून अधिक पुरस्कार जिंकले आहेत. पण इतकं यश मिळालं असतानाही अरजीत सिंगचे पाय मात्र जमिनीवर आहेत. त्याचा हा स्वभाव अनेकदा दिसत असतो, ज्याचं त्याच्या चाहत्यांना आणि इतरांनाही अप्रूप वाटतं.