Ganesh Chaturthi 2021 : गणरायाचरणी सलमान नतमस्तक; पाहून तुम्हीही म्हणाल, 'गणपती बाप्पा मोरयाsssss'

बाप्पासाठी काहीपण.... बहिणीच्या पतीसोबत सलमानचा खास अंदाज

Updated: Sep 8, 2021, 06:22 PM IST
Ganesh Chaturthi 2021 : गणरायाचरणी सलमान नतमस्तक; पाहून तुम्हीही म्हणाल, 'गणपती बाप्पा मोरयाsssss' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान, अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाची गणरायावर असणारी श्रद्धा सारेच जाणतात. दरवर्षी सलमानच्या घरी बाप्पा विराजमान होतात आणि सारे खान कुटुंबीय मित्रपरिवारासह गजमुखाची सेवा करतात. 

अशा या कलाधिपती गणरायाला यंदा सलमान एका खास अंदाजात श्रद्धासुमनं अर्पण करताना दिसत आहे. बाप्पा हा 64 कलांचा अधिपती असल्यामुळं कलेचाच नजराणा सादर करत सलमाननं दणक्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे. याची एक झलकही त्यानं सर्वांच्या भेटीला आणली आहे.  (salman khan aayush sharma film antim song vighnaharta teaser)

अर्पिता खान, म्हणजेच आपल्या बहिणीच्याच पतीसोबत; आयुष शर्मा याच्यासोबत सलमान 'अंतिम: द फाइनल ट्रूथ' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गणपतीवरच चित्रीत एक खास गाणं यंदाच्या वर्षी ऐन गणेशोत्सवादरम्यानच तो चाहत्यांच्या भेटीला आणत आहे. या गाण्याच्या टीझरचा व्हिडीओ सलमाननं शेअर केला आहे. ज्यामध्ये ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि त्यातूनच दिसणारी बाप्पाची मूर्ती अतिशय विनोलभनीय दृश्य तयार करत आहे. 

सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याच धाटणीचं हे गाणं प्रदर्शित होत असल्यामुळं त्याला सहज लोकप्रियता मिळेल अशी सलमानच्या फॅन्सची आशा आहे. कारण, या गाण्याच्या टीझरचा व्हिडीओ शेअर करताच तो व्हायरल झाला आणि पूर्ण गाणं ऐकण्यासाठी अनेकांनीच उत्सुकता व्यक्त केली. 

महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनात साकारला जाणारा 'अंतिम: द फाइनल ट्रूथ' हा चित्रपट मराठीतील 'मुळशी पॅटर्न'चा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या मराठी चित्रपटाला कमालीची लोकप्रियता मिळाली होती. त्यातील गाणीही विशेष गाजली होती. तेव्हा आता सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.