बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाह यांना नुकतंच 2023 आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. यानिमित्ताने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमधील पदानुक्रम यावर भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर यावेळी त्यांनी आपण आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही असंही हसत सांगितलं आहे. 'वक्त' या चित्रपटात अक्षय कुमारपेक्षाही वय कमी असताना शेफाली यांनी त्याच्या आईची भूमिका निभावली होती. यावरुन बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये होणारा दुजाभाव नेहमी चर्चेत असतो.
सेटवर नेमका क्रम कसा असतो असं विचारण्यात आलं असता शेफाली शाह यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "खरं सागायचं तर मला अनेक उत्तम लोकांसह काम करण्याची संधी मिळाली आहे. मी हे उगाच सांगायचं म्हणून सांगत नाही आहे. हे खरं आहे. मी आक्षेपार्ह वागणाऱ्या एखाद्या दुसऱ्या अभिनेता आणि दिग्दर्शकासह काम केलं आहे. पण त्याव्यतिरिक्त मी अशा अनेक दिग्दर्शकांसह काम केलं आहे, जे अभिनेत्यांना फक्त अभिनेता न समजता सहकारी समजतात". यावेळी हसत हसत शेफाली शाह यांनी आपण आयुष्यात कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही असंही सांगितलं. 'वक्त' चित्रपटात शेफाली शाह यांच्यासह अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्राही प्रमुख भूमिकेत होते.
दरम्यान एका महिन्यापूर्वी 'न्यूज 18'ला दिलेल्या मुलाखतीत शेफाली शाह यांनी रस्त्यावर आलेला छेडछाडीचा अनुभव सांगितला होता. "मला वाटतं प्रत्येकाला हा अनुभव कधीतरी आलेला असतो. मला आठवतं मी तेव्हा लहान होते आणि शाळेतून घरी जाताना मार्केटमध्ये पोहोचली असता हे घडलं होतं. मी त्यावेळी काहीच करु शकले नव्हते. मी फार तरुण होते आणि घाबरले होते. कोणीही माझ्या मदतीला पुढे आलं नव्हतं. तिथे गर्दी होती, पण हे त्यामागील स्पष्टीकरण असू शकत नाही. मला वाटतं प्रत्येक महिला या परिस्थितीला सामोरी जात असते," असं शेफाली शाह यांनी सांगितलं होतं.
"मी सेलिब्रेटी आहे की नाही याच्याने काही फरक पडत नाही. पण मला वाटतं जर आपण आपल्या मुलांचं योग्य संगोपन केलं तर मुली सुरक्षित राहतील. मला दोन मुलं असून, त्यांचं नीट संगोपन करणं माझी जबाबदारी आहे. आता आपण मुलींच्या सुरक्षेबद्दल बोलत नाही. आपण फक्त लोक सुरक्षित, आदरपूर्वक राहतील यावर बोलतो. त्यासाठीच मला दोन संवदेनशील व्यक्तींना मोठं करायचं आहे," असं शेफाली शाह यांनी सांगितलं.
इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023 मध्ये नेटफ्लिक्सवरील ड्रामा सिरीज 'दिल्ली क्राइम' 2 मधील भूमिकेसाठी शेफाली शाह यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकन मिळालं आहे. शेफाली शाह या सत्या, मान्सून वेडिंग, दिल धडकने दो, अजीब दास्तां, जलसा, डार्लिंग्स मधील अभिनयासाठी ओळखल्या जातात.