मुंबई : हिंदी चित्रपटांसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव पोहोचवणाऱ्या कलाकारांच्या नावात ऐश्वर्या रायचाही समावेश होतो. संपूर्ण जगभरात ऐश्वर्याच्या चाहत्यांचा आकडा मोठा आहे. 1 नोव्हेंबर 1973 ला ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील बंगळुरू येथे झाला होता. पण, कुटुंब मुंबईत येत असल्या कारणानं तिलाही मुंबईत यावं लागलं.
इथेच तिचं शिक्षणही पूर्ण झालं. ऐश्वर्याची आणखी एक ओळख म्हणजे, ती बच्चन कुटुंबाची सून आहे. अमिताभ बच्चन यांचा मुलगा, अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत ती विवाहबंधनात अडकली. त्यांच्या लग्नामागे एक रंजक किस्सा आहे.
काय आहे तो रंजक किस्सा?
ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली ओळख 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेमाचे बरेच किस्से होते. पण पुढे त्यांचं नातं तुटलं. ज्यानंतर ऐश्वर्याचं नाव विवेक ओबेरॉयशी जोडलं गेलं. पण, त्यांचंही ब्रेकअप झालं.
तिथे अभिषेकचा साखरपुडा करिष्मा कपूर हिच्याशी झाला होता. पण, त्यांचं नातं लग्नापर्यंत मात्र पोहोचू शकलं नाही. 'उमराव जान' या चित्रपटापासून ऐश्वर्या आणि अभिषेकची जवळीक वाढत गेली.
अभिषेकनं ऐश्वर्याचा अतिशय 'फिल्मी' अंदाजात प्रपोज केलं होतं. टोरंटोमध्ये 'गुरु' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तिला खोटी अंगठी घालून त्यानं प्रपोज केलं होतं. ऐश्वर्यानंही हे प्रपोजल स्वीकारलं. 2007 मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली.
अॅश आणि अभिषेकचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं आणि ऐश्वर्या तेव्हापासून बच्चन घराण्याची सून म्हणून ओळखली जाऊ लागली. लग्नानंतर जवळपास 4 वर्षांनंनंतर ऐश्वर्यानं एका मुलीला जन्म दिला. आराध्याच्या येण्यानं बच्चन कुटुंबात एक नवा बहर आला.