मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचा किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या जीवनाच्या अतिशय आव्हानात्मक काळातून पुढे जात आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलं. ज्यानंतर आर्यनच्या सुटेचा दिवस लांबणीवरच जात आहे. (Shahrukh khan, Aryan khan, gauri khan)
शक्य ते सर्व प्रयत्न करुनही आर्यनची कोठडी वाढत असल्यामुळे शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी आता अडचणीत सापडले आहेत. हा प्रसंग नेमका कसा हाताळावा यासाठीच ते विचाराधीन गेले आहेत.
आर्यन कोठडीत असण्याला आता जवळपास आठवडाभराहून अधिक काळ लोटला आहे. ज्यामुळं शाहरुखची झोप उडाली आहे. गौरी आणि शाहरुखला जबर हादरा बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आर्यन परतल्यावर त्याच्या भविष्याबाबतचे निर्णयही कुटुंबानं घेतल्याचं कळत आहे.
आर्यनच्या अडचणी वाढत असल्याचं कळताच शाहरुखनं देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज कामाला लावली. ज्यांच्याकडून त्याला आर्यनच्या सुटकेची हमीही देण्यात आली. पण, सध्या मात्र तसं काहीही होताना दिसत नाहीये. ज्यामुळं ही अनिश्चितता त्याच्या अस्वस्थतेचं कारण ठरु लागली आहे. आर्यनशी थेट संपर्क साधता येत नसल्यामुळे काही संबंधित व्यक्तींना शाहरुख आणि गौरी सतत संपर्क साधत असून, आर्यनच्या आरोग्याची चौकशी करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण, त्यांच्यापर्यंत आर्यनची फारशी माहिती पोहोचू शकत नसल्यामुळं हे सेलिब्रिटी कपल आता बेचैन झालं आहे. त्यांच्याकडून आर्यनला घरी बनवलेलं जेवण आणि त्याच्या काही गोष्टी त्याच्याजवळ पाठवण्यात येण्याची विनंतीही वारंवार करण्यात येत आहे.
एकिकडे शाहरुख आणि गौरीला मानसिक हादरा बसलेला असतानाच चित्रपट विश्वातून कलाकार मित्रमंडळी त्यांना आधार देत आहेत. सलमान खान, करण जोहर, फराह खान या साऱ्यांनीच किंग खानचा आधाराचा हात दिला आहे. दरम्यान, आर्यनच्या जामीन अर्जावर आता 13 ऑक्टोबरला सुनावणी केली जाणार असून, त्याचं भविष्य काही तासांतच ठरण्याची चिन्हं आहेत.