अरेरे! कमाईचे आकडे उंचावतानाच 'भारत'ला ग्रहण

सलमानच्या चित्रपटाला फटका ........ 

Updated: Jun 6, 2019, 04:11 PM IST
अरेरे! कमाईचे आकडे उंचावतानाच 'भारत'ला ग्रहण title=

मुंबई : 'दबंग खान', 'भाईजान' अशा विविध नावांनी ओळल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खान याची मुख्य भूमिका असणारा भारत हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यंदाच्या वर्षी रमजान ईदच्या मुहूर्तावर 'भारत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ईदची सुट्टी, चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी असणारं कुतूहल असं एकंदर वातावरण पाहता 'भारत'च्या कमाईच्या आकड्यांनीही चांगला वेग पकडला होता. पण, आता मात्र या वेगाला वेसण घातलं जाण्याची शक्यता आहे. कारण.... 

इंटरनेटची उपलब्धता आणि सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता याचा फटका चित्रपटाला बसला असल्याचं लक्षात येत आहे. तमिळरॉकर्सकडून सलमानचा 'भारत' हा चित्रपट लीक करण्य़ात आला आहे. ज्यामुळे तो डाऊनलोड करता येणं शक्य झालं आहे. तमिळरॉकर्सवरुन एखादा चित्रपट लीक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 

बॉलिवूड चित्रपटांपुढे असणाऱ्या काही महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक म्हणजे ते लीक होण्याचा धोका. चित्रपट लीक होण्याचं हे आव्हान अतिशय चिंताजनक आहे. ज्याचे थेट पडसाद हे त्या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांवरही होतात. मुळात यावर अनेकदा आळा घालण्याचेही प्रयत्न करण्यात आले. पण, या साईटचे अनेक प्रॉक्सी डोमेन असल्यामुळे या प्रकरणाला आळा घालण्यात वारंवार अपयश येत आहे.

सलमान आणि कतरिना यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'भारत' या चित्रपटाआधी बऱ्याच मोठ्या चित्रपटांना लीक होण्याचा फटका बसला होता. ज्यामध्ये '२.०', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान', 'गली बॉय' या आणि अशा आणखी काही चित्रपटांचा समावेश होता.