गायक- संगीतकार बालाभास्करचा मृत्यू अपघातामुळे नव्हे, तर....

आता या प्रकरणाला मिळणार नवं वळण..... 

Updated: Jun 6, 2019, 03:39 PM IST
गायक- संगीतकार बालाभास्करचा मृत्यू अपघातामुळे नव्हे, तर....  title=

तिरुवअनंतपूरम : मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्ष आणि श्रोत्यांच्या प्रशंसेस पात्र ठरणाऱ्या गायक बालाभास्कर यांच्या निधनाविषयी पुन्हा एकदा खळबळजनक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध कलाकार कलाभवन सोबी यांनी बुधवारी याविषयीची माहिती उघड करत एक महत्त्वाचा खुलासा केला. 

बालाभास्कर यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही संशयास्पद हालचाली आणि गोष्टी घडल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. अपघात झाला त्यादरम्यान, स्वत: सोबी अपघात तिरुवअमंतपूरमच्या दिशेने जात होते. बुधवारीत गुन्हे शाखेपुढे त्यांनी ही माहिती मांडली. बालाभास्कर यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या पोलीस दलासह ते होते. जवळपास तीन तास त्यांनी याप्रकरणीची माहिती दिल्याचं कळत आहे. 

'बालाभास्कर यांचा मृत्यू हा अपघातामुळे झाला नाही. मी पोलिसांना याविषयीची माहिती दिली आहे. पण, मी जसं सांगितलं आहे की माध्यमांशी मात्र मी या गोष्टी बोललो नाही आहे. मी केलेले गौप्यस्फोट पाहता या प्रकरणाला एक नवं वळण मिळणार आहे' असं ते म्हणाले. 

दुर्घटना झाली त्या ठिकाणच्या काही संशयास्पद गोष्टींचा खुलासा करणाऱ्या सोबी यांना ते अपघातग्रस्त भागातून जात असतेवेळी धमक्यांचे फोनही येत असल्याचा खुलासा त्यांनी केला. तपासयंत्रणांकडे य़ा गोष्टीचा उलगडा करण्यात गैर काहीच नाही, असं म्हणत आपल्याला जे योग्य वाटलं तेच केलं असल्याचं ठाम मत त्यांनी मांडलं. त्यामुळे आता बालाभास्कर यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशी प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाल्याचं कळत आहे. 

सप्टेंबर महिन्यात झाला होता अपघात.... 

२५ सप्टेंबरला एका भीषण अपघातात गायक- संगीतकार बालाभास्कर यांच्या मुलीला जीव गमवावा लागला होता. तर, काही दिवस अतिद्क्षता विभागात मृत्यूशी झुंज दिल्यांनंतर २ ऑक्टोबरला बालाभास्कर यांचीही प्राणज्योत मालवली होती. या अतिभीषण अपघातातून त्यांची पत्नी आणि कार चालक बचावले होते. अतिशय संशयास्पद अशा वातावरणात झालेला हा अपघात आणि हे सारं प्रकरण पाहता बालाभास्कर यांच्या वडिलांनी पैशांच्या कारणावरुन अपघात घडवून आणल्याचं म्हणत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. येत्या काळात या प्रकरणाला कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.