'आ रहा हूँ....' म्हणत नव्या रुपात इरफान प्रेक्षकांच्या भेटीला

इरफानच्या कामाने सेटवरील वातावरण भावूक 

Updated: Apr 8, 2019, 04:11 PM IST
'आ रहा हूँ....' म्हणत नव्या रुपात  इरफान प्रेक्षकांच्या भेटीला  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अतिशय दुर्धर अशा न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर या आजाराला तोंड दिल्यानंतर अभिनेता इरफान खान काही दिवसांपूर्वी भारतात परतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी असणारं नातं आणखी दृढ करणाऱ्या इरफानचा एक वेगळा आणि तितकाच नवा अंदाज यावेळी पाहायला मिळाला. त्यामागोमागच आता पुन्हा एकदा तो नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे. इरफानचं हे रुप आहे, त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने. 

राजस्थानमध्ये चित्रीकरण सुरू असणाऱ्या 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटातील फर्स्ट लूक त्याने सर्वांसमोर प्रदर्शित केला आहे. या फोटोमध्ये इरफान एका मिठाईच्या दुकानाबाहेर उभा राहिलेला दिसत असून, त्याचा लूक चित्रपटाच्या कथानकाविषयी विचार करण्यास भाग पाडत आहे. इरफानने हा लूक शेअर करताच सोशल मीडियावर अनेकांनीच त्याचं कौतुक करण्यास सुरुवात केली. काहींनी 'अंग्रेजी मीडियम'मधील त्याचा हा अंदाज शेअरही केला. 

अभिनेत्री राधिका मदान या चित्रपटात इरफानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. खुद्द राधिकानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली होती. करिना कपूर खान या चित्रपटात इरफानच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याच्याही चर्चा आहेत. पण, त्याविषयीची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पण, राधिकाने शेअर केलेल्या फोटोतून मात्र करिनासुद्धा या चित्रपटात सहभागी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

इरफानच्या कामाने सेटवरील वातावरण भावूक 

'अंग्रेजी मीडियम'साठी ज्यावेळी इरफानने त्याच्या पहिल्या दृश्याचं चित्रीकरण केलं तेव्हा सेटवरील सर्व वातावरण अत्यंत भावूक असल्याचं चित्रपट निर्माते दिनेश विजन यांनी सांगितलं. होमी अदजानिया दिग्दर्शित 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्या काळानंतर इरफान रुपेरी पडद्यावर झळकणार आहे, त्यामुळे अर्थातच हा चित्रपट प्रेक्षकांप्रमाणेच त्याच्यासाठीही तितकाच खास आहे.