Bhushan Pradhan : काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. तर नुकताच 'जुनं फर्निचर' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या भूषण प्रधाननं एक गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली. हा चित्रपट केल्यानंतर भूषण त्यांच्या आईबाबांना रोज आवर्जून फोन करतो. याचं कारणही त्यानं सांगितलं आहे. तसेच यावेळी भूषणनं त्याच्या बाबांच्या मनातील एक इच्छाही पूर्ण झाल्याचे यावेळी सांगितले.
या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात भूषणनं अनेक गोष्टींविषयी सांगितलं आहे. त्यावेळी भूषण हा त्याच्या आई-वडिलांना रोज कॉल करतो याविषयी सांगत म्हणाला, '' प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण आपल्या आई-बाबांसाठी खूप करतो. परंतु आई-वडिलांना नक्की काय हवे आहे, हे मुलांना कळतच नाही. दिवसभरातील थोडा वेळ, प्रेमाचे, आपुलकीचे दोन शब्द त्यांना हवे असतात आणि आपण तेच नेमके करत नाही. कामं तर होतच राहातील, परंतु आई वडिलांकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि याची जाणीव मला हा चित्रपट करताना झाली. म्हणूनच मी घराच्या बाहेर असताना आई-बाबांना नित्यनियमानं फोन करतो. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जुनं आणि नवं फर्निचर या दोघांना एकत्र आणून एक परीपूर्ण घर नक्कीच बनू शकतं."
पुढे वडिलांची एक इच्छा पूर्ण केल्याविषयी सांगत भूषण म्हणाला, "मी अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम करतोय. परंतु महेश मांजरेकर सरांसोबत काम करण्याची माझी मनापासून इच्छा होती आणि माझ्यापेक्षाही माझ्या वडिलांची इच्छा जास्त होती. त्यामुळे 'जुनं फर्निचर' हा चित्रपट माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. आज माझे बाबाही खूप खुश आहेत.''
हेही वाचा : वय म्हणजे फक्त आकडा! 66 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं केलं दुसरं लग्न, तिचा पती आहे तरी कोण?
सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर'ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर यतिन जाधव निर्माते आहेत.