Bharti Singh and Haarsh Limbachiyaa on tv industry : छोट्या पडद्यावरील कॉमेडी क्वीन अशी ओळख असणारी भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचियानं त्यांच्या पॉडकास्टमध्ये टीव्हीमध्ये काम करण्याच्या कल्चरवर वक्तव्य केलं आहे. या पॉडकास्टमध्ये बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्राची देसाई हे त्यांच्या 'साइलेंस 2... कॅन यू हियर इट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यावेळी टिव्ही शोमध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगितला.
सुरुवातीला स्वत: चा अनुभव सांगत हर्ष म्हणाला, "सुरुवातीला कलाकार सेटवर 15 - 15 तास काम करायचे आणि झोप यायला नको म्हणून त्यासाठी सतत काही ना काही करायचे. इतकंच नाही तर लवकरात लवकर जास्तीत जास्त काम व्हावं यासाठी देखील ते प्रयत्न करायचे. फक्त कलाकार नाही तर दिग्दर्शक आणि क्रिएटिव्स देखील काम करायचे. झोपेच्या कमीमुळे त्यांना हार्ट अटॅक यायचे."
भारतीनं सांगितलं की "मी डेली सोपमध्ये मुलींना ड्रिप लावून काम करताना पाहिलं आहे. त्यांना घरी जाण्याची परवानगी नसायची कारण शॉट हा टेलिकास्ट झालेला नसायचा. त्यावर हर्षनं सांगितलं की काही काही दिग्दर्शक तर असेही आहेत ज्यांनी फक्त योग्य तो शॉट शूट करण्याशी देणं घेणं असतं. त्यांना या गोष्टीची काळजी नसते की कलाकार ठीक आहेत की नाही." प्राचीनं हर्षच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत सांगितलं की "जेव्हा मी टीव्हीसाठी काम करायचे तेव्हा झोप घालवण्यासाठी दिवस-रात्र कॉफी प्यायचे."
हर्श लिंबाचियानं पुढे सांगितलं की "एक शो होता ज्यात एका मुलाचा पाय तुटला होता. मी निर्माता होतो. मी म्हटलं की आता शूटिंग होणार नाही, तर चॅनलच्या लोकांनी फोन करुन सांगितलं की असं बोलणारा तू आहेस कोण? शूटिंग होणार, मग त्यानंतर मुलीला हॉस्पिटलमध्ये पाठवलं, तिच्यावर उपचार करण्याता आला. शोच्या शूटिंगच्या दरम्यान, दर प्रत्येक तासाला 1-2 लाख रुपये खर्च होतात."
हर्ष लिंबाचियानं सांगितलं की "आता असं होत नाही. आता बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा झाली आहे. जर कोणी नॉन-फिक्शन शो देखील केला. तरी प्रयत्न करतात की 9 तासाच्या शिफ्टमध्ये शूटिंग संपवून घेऊ. कधी-कधी काही झालं तर शूटिंगची वेळ वाढते. पण आता 10 ते 11 तासात शूटिंग संपवतात."
हेही वाचा : दादा कोंडके आणि स्मगलर हाजी मस्तानच्या मैत्रीचे न ऐकलेले किस्से
मनोज बाजपेयी आणि प्राची देसाईच्या 'साइलेंस 2... कॅन यू हियर इट’ विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट झी5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच मनोजनं एसीपी अविनाश वर्मा ही भूमिका साकारली आहे. तर प्राची आणि मनोजशिवाय या चित्रपटात साहिल वैद, वकार शेख, दिनकर शर्मा आणि पारुल गुलाटी देखील आहे.