Ashok Saraf Maharashtra Bhushan: मराठी चित्रपसृष्टीत अनेक अभिनेते एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. सोशल मीडियावरुन त्यांच्या पोस्ट मैत्रीचा प्रत्यय देत असतात. पण जर तुम्ही जुना काळ पाहिला तर त्यावेळीही असे अनेक अभिनेते होते जे मैत्रीसाठी जीवाला जीव देण्यास तयार होते. त्यातीलच मित्रांची अशी एक जोडी म्हणजे नाना पाटेकर आणि अशोक सराफ आहेत. अशोक सराफ (Ashok Saraf) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) हे मराठी चित्रपटसृष्टीतील घट्ट मित्रांपैकी एक आहेत. त्यांच्या मैत्रीचे असे अनेक किस्से आहेत, ज्यामधून ते उत्तम माणूस असल्याचंही दिसतं.
नाना पाटेकर यांनी अशोक सराफ आपले किती चांगले मित्र आहेत हे उलगडताना त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीचाही उल्लेख केला होता. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे सांगितलं होतं. “हमीदाबाईची कोठी नाटक करताना मला 50 रुपये मिळायचे आणि अशोक सराफला 250 रुपये मिळायचे. त्याने मला पैशांची खूप मदत केली," असं नाना पाटेकर म्हणाले होते.
"मधल्या वेळात नाटक नसताना आम्ही पत्ते खेळायचो. त्यावेळी तो मुद्दामून माझ्याकडे पाच दहा रुपये हारायचा. मला कळायचं तो मुद्दामून करतोय. पण पैशांची गरज होती त्यामुळे मी सुद्धा घ्यायचो," असा खुलासा नाना पाटेकरांनी केला होता.
जेव्हा नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफ यांचा जीव; खांद्यावर उचलून रस्त्यावर धावले होते
दरम्यान एकदा गणेशोत्सवात अशोक सराफ यांनी आपल्या हाती कोरा चेक दिला होता अशी आठवणही त्यांनी सांगितली होती. ते म्हणाले होते की, "एकदा गणपतीला माझ्याकडे पैसे नव्हते. फुलांचा सगळा खर्च कसा करायचा हा प्रश्न होता. सकाळी सहा साडे सहा वाजता अशोक फिल्मसिटीला शुटिंगला चालला होता. माटुंग्याच्या घऱी खिडकीवर टकटक केलं, माझ्या हातात एक कोरा चेक दिला. खात्यात 10 हजार आहेत…तुला हवे तेवढे काढ असं म्हणून तो निघून गेला. मी तीन हजार रुपये काढले होते. काही वर्षानंतर आम्ही एका सिनेमात एकत्र काम करत होतो. त्यावेळी मी त्याला ते दिले”.
दरम्यान आपण जेव्हा कधी नाटकासाठी एकत्र जायचो तेव्हा मी अशोक सराफ यांच्या पायाला आणि डोक्याला तेल लावायचो. मला याबद्दल ते 5 रुपये द्यायचे असंही नाना पाटेकरांनी सांगितलं होतं. आजही मला ते भेटल्यावर मी पायाला तेल लावून देतो असं ते सांगतात.