Amruta Khanvilkar On Working with Ram Gopal Varma : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अमृताच्या अभिनयाचे आणि डान्सचे लाखो चाहते आहेत. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची ओळख निर्माण केली. अमृतानं बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्या यादीत ‘सत्यमेव जयते’, ‘मलंग’ आणि 'राझी' हे चित्रपट आहेत. अमृता ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी देखील ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमृतानं तिचा बॉलिवूड चित्रपटसृष्टीत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
अमृतानं नुकतीच प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या 'पटलं तर घ्या' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अमृतानं तिचा हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अमृता तिचा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव यावेळी सांगितला. राम गोपाल वर्मा यांच्या कॉन्ट्रॅक्ट या चित्रपटात मी काम केलं होतं. त्या चित्रपटात माझे तीन ते चारच सीन होते. त्यानंतर त्यांनी मला लगेचच दुसऱ्या चित्रपटासाठी ऑफर दिली. त्या चित्रपटाचे नाव ‘फूंक’ असे होते. राम सरांसोबत मी लागोपाठ तीन चित्रपट केले होते. त्यामुळे मला ‘रामूज’ असं बोलायचे. माझ्याविषयी असं का म्हटलं जात आहे, असं का छापून आलं सगळ्यात आधी मला हा प्रश्न पडला कारण मला काही कळलंच नाही. त्यानंतर मला कळलं की एकाच दिग्दर्शकासोबत तीन किंवा त्यापेक्षा जास्त चित्रपट केले की असं म्हटलं जातं.
पुढे मुलाखतीत अमृताला प्रश्न विचारण्यात आला की हिंदी चित्रपटसृष्टीत काम सुरु ठेवायला हवं होतं का? याबाबत काय वाटतं? यावर उत्तर देत अमृता म्हणाली, "खंत अशी नाही पण सुरुवातीला मी खूप घाबरायचे. मला भीती वाटायची. कारण हिंदी भाषेवर माझं प्रभुत्व नव्हतं. त्यामुळे जेव्हा मी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली तेव्हा मला लोक व्हर्नक्युलर म्हणजेच प्रादेशिक भाषा बोलणारी म्हणून बोलायचे. मी चांगली दिसत नाही, त्यांना अपेक्षित तशी माझी फिगर नाही असं त्यांना वाटायचं."
याविषयी पुढे बोलताना अमृता म्हणाली, मी जेव्हा हिंदी रिअॅलिटी शोचे सुत्रसंचालन करण्यास सुरुवात केली, तेव्हा सुद्धा मला चांगलं हिंदी बोलता येत नव्हतं. त्यानंतर मी हिंदी, उर्दू या दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास केला. पण खरं सांगायचं झालं तर त्या काळी मी खूप घाबरायचे. हेच कारण होतं की मी जास्त प्रयत्नही केले नाहीत. तेव्हा तर मार्गदर्शन करणारं देखील कोणी नव्हतं.
पुढे आजच्या आणि त्या काळातील अमृतामधील फरक सांगत ती म्हणाली, "आता जी अमृता तुम्हाला दिसते, तशी मी तेव्हा नव्हते, या गोष्टीची मला खंत आहे. अमृता सगळ्यात शेवटी 'चंद्रमुखी' या चित्रपटात दिसली होती. तर लवकर ती 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटात दिसणार आहे.