Badla Movie Review : तिचं चक्रव्यूह आणि तिचाच 'बदला'

सुजॉय घोष दिग्दर्शित 'बदला' हा पहिल्या दृष्यापासून ठराविक पात्राभोवती फिरतो आणि उलगडत जातो जो शेवटच्या दृष्यापर्यंत खिळवून ठेवतो.

Updated: Mar 8, 2019, 02:55 PM IST
Badla Movie Review : तिचं चक्रव्यूह आणि तिचाच 'बदला' title=

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 
दिग्दर्शक : सुजॉय घोष
निर्माते : गौरी खान
मुख्य भूमिका : अमिताभ बच्चन, तापसी पन्नू, अमृता सिंग, टोनी ल्यूक
संगीत दिग्दर्शन : अमल मलिक, अनुपम रॉय

महाभारत...आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही असे प्रसंग येतात जे पाहता मार्ग सूचत नाही. तेव्हा आठवतं महाभारत...कित्येक वर्षापासून लिहून ठेवलेलं हे महाकाव्य एक मार्गदर्शक आहे आणि यापुढेही राहील. हे 'बदला' पाहताना लक्षात येतं बदला...कोणी म्हणतात सूड, कोणी म्हणतं सडेतोड उत्तर पण अनेकांसाठी हा एक असा मार्ग असतो जो बहुधा समाधानकारक असतो. 

सुजॉय घोष दिग्दर्शित 'Badla' हा पहिल्या दृष्यापासून ठराविक पात्राभोवती फिरतो आणि उलगडत जातो जो शेवटच्या दृष्यापर्यंत खिळवून ठेवतो. अर्जुन, नैना, तानी, सनी, निम्मी(निर्मल) आणि बादल गुप्ता या पात्रांभोवती बदला फिरतो. एका हत्येचं गुपीत उलघडण्यासाठी गेलेल्या वकीलांना म्हणजेच बादल गुप्ता साकारणाऱ्या अमिताभ बच्चन यांना एका अशा घटनेविषयीची रहस्य कळतात जी एका चाणाक्ष महिलेनेच रचून त्यांच्या पुढ्यात ठेवलेली असतात. पण महिलेचाच बदला घेण्यासाठी दुसऱ्या महिलेने रचलेल्या चक्रव्यूहाची मांडणी दिग्दर्शकाने साचेबद्धपणे केली आहे. प्रत्येक मिनिटाला या मांडणीचा एक एक पैलू उलगडत जातो तो म्हणजे कलाकारांच्या दमदार अभिनयाने आणि अर्थातच दमदार कथानकाने.

'बदला'मध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू हे मध्यवर्ती भूमिकेत असले तरीही अमृता सिंग, टोनी ल्यूक हे कलाकार विशेष लक्ष वेधतात. मुख्य म्हणजे महानायक  म्हणून अमिताभ बच्चन यांना का संबोधण्यात येतं याचीच अनुभूती वारंवार होते. तापसी पन्नूचा अभिनय आणि आणि बिग बींपुढे तिने पात्र निभावण्यासाठी घेतलेली मेहनत पाहता तिची प्रशंसा कराविशी वाटते. इथे पुन्हा एक गोष्ट सांगाविशी वाटते की बदला हा कोण, कधी, कुठे आणि कसा घेईल याची शाश्वती नाही. त्याप्रमाणे तो कुठल्या प्रकारे घेतला जाईल हे सुद्धा सांगता येत नाही.

बिग बी या चित्रपटात असले तरीही ते यात कुठेच नाहीत. त्यामुळे तुम्हाला जे दिसतंय ते असेलच असं नाही. हे असं का? असा प्रश्न पडत असेल आणि एका बदल्याची वास्तवदर्शी गोष्ट पाहायची असेल तर महाभारताची आठवण करून देणारा हा 'बदला' नक्की पाहा. 

चार स्टार

- सायली पाटील
SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com