मुंबई : अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य अभिनेता आता साऱ्या देशातील प्रेक्षकांच्या ओळखीचा झाला आहे. नुसता ओळखीचा नाही, तर तो अनेकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. 'पुष्पा' या चित्रपटानं अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेत उल्लेखनीय भर टाकली. इथं बॉलिवूडमध्येही त्याच्या नावाचा डंका वाजला. (Allu Arjun)
आता म्हणे याच अल्लू अर्जुनच्या वाटेत एक बॉलिवूड अभिनेता उभा ठाकला आहे.
नव्या जोमाच्या या बॉलिवूड अभिनेत्यामुळं अल्लू अर्जुनचा 'अला वैकुंठपुरमलो' हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही.
गोल्डमाईन फिल्म्सच्या मनीष शाह, ज्यांच्याकडे या चित्रपटाच्या हिंदी वर्जनचे सर्व अधिकार आहेत, त्यांनी याबाबतची माहिती दिल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
हिंदी प्रेक्षकवर्गामध्ये आणि चित्रपट वर्तुळामध्ये अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला. ज्यानंतर आता त्याचे काही दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित केले जाणार असल्याची माहिती समोर आली.
याचाच एक भाग म्हणून 'अला वैकुंठपुरमलो' हा चित्रपट 26 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. चित्रपटाच्या डबिंगसाठी शाह यांनी 2 कोटी रुपये खर्चही केला होता.
चित्रपटाती तेलुगू गाणीही हिंदीत ध्वनीमुद्रित केली गेली. पण, आयत्या वेळी चित्रपटाचं प्रदर्शन टळलं. असं म्हटलं जात आहे की हे सगळं 'अला वैकुंठपुरमलो'च्या हिंदी रिमेक 'शहजादा'च्या निर्मात्यांच्या सांगण्यावरुन करण्यात आलं आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन या चित्रपटातून झळकणार आहेत. रोहित धवन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. मनीष शाह यांनी एका मुलाखतीत याबाबतची सविस्तर माहिती दिली.
अल्लू अरविंदच्या सांगण्यावरून चित्रपट थांबवला गेला. जो हिंदी रिमेकचा निर्माता आहे. जर कार्तिक हा हिंदी चित्रपट सोडतोय तर अल्लू अरविंदला यामुळे नुकसान होणार असल्याचं वास्तव त्यांनी समोर ठेवलं.
'अला वैकुंठपुरमलो' चित्रपटगृहांमध्ये हिंदी भाषेत प्रदर्शित व्हावा असं निर्मात्यांना मुळीच वाटत नाही, जर असं झालं तर कार्तिकनं तो हा चित्रपट सोडण्याची धमकीच दिली आहे.
असं झाल्यास निर्मात्यांचे 40 कोटी रुपये पाण्यातच जातील, कार्तिकचं हे वागणं योग्य नाही, सिद्धांतांना धरून नाही, असंही शाह म्हणाले.
आपण अल्लू अरविंदला ओळखत असल्यामुळं मागच्या 10 वर्षांच्या परिचयाखातर त्यांनी या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं रिलीज थांबवलं आहे ही वस्तुस्थिती.
#AlaVaikunthapurramuloo (Hindi) will not open in cinemas. However to honour fans, we are excited to announce the release of this highly anticipated film on DHINCHAAK TV, India’s leading movie channel, A Goldmines venture, on February 6th. pic.twitter.com/PfxVpbOgWk
— Goldmines Telefilms (@GTelefilms) January 22, 2022
शाह यांची इच्छा काय?
मनीष शाह यांची अशी इच्छा आहे की, 'पुष्पा' पेक्षाही 'अला वैकुंठपुरमलो' हा सुपरहिट ठरु शकतो. पण, हे थिएटर रिलीजशिवाय शक्य नाही असा त्यांचा निष्कर्ष.
दरम्यान, 6 फेब्रुवारीला मनीषच्याच वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. त्रिवित्रम श्रीनिवास दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत पूजा हेगडे, तबू, सचिन खेडेकर, मुरली शर्मा हे कलाकारही झळकले आहेत.