'तुझे गुडघे इतके काळे आहेत की त्यांना...', अक्षय कुमारच्या 'त्या' कमेंटमुळे अभिनेत्री गेली होती नैराश्यात, 30 वर्षांनी खुलासा

अक्षय कुमार (Akshay Kumar) याने रंगावरुन केलेल्या कमेंटमुळे आपण नैराश्यात गेले होते असा खुलासा त्याची पहिली अभिनेत्री शांती प्रियाने (Shanti Priya) केला आहे. अक्षय कुमार त्या कमेंटबद्दल आपली कधीच माफी मागितली नाही असंही तिने सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 22, 2023, 07:42 PM IST
'तुझे गुडघे इतके काळे आहेत की त्यांना...', अक्षय कुमारच्या 'त्या' कमेंटमुळे अभिनेत्री गेली होती नैराश्यात, 30 वर्षांनी खुलासा title=

बॉलिवूड अभिनेत्री शांती प्रिया हे नुकतंच तिचा पहिला सहकलाकार अभिनेता अक्षय कुमारशी होणाऱ्या तुलनेवर भाष्य केलं आहे. शांती प्रियाने सौगंध चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 1991 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. दरम्यान, सिद्दार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत शांती प्रियाने अक्षय कुमारने रंगावरुन आपली खिल्ली उडवली होती असा खुलासा केला आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इक्के पे इक्का' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हा किस्सा घडला होता. 

शांती प्रियाने सांगितलं आहे की, "हा फार संवेदनशील विषय आहे. मला वाटत नाही की अक्षय कुमारच्या हे लक्षात आलं होतं. त्याने सर्वांसमोर मला विचारलं होतं की, तुला काही जखम झाली आहे का? तू कुठे पडली आहेस का? मी नाही उत्तर दिलं होतं. तसंच असं का विचारत आहेस? असं विचारलं असता त्याने म्हटलं होतं की, मग काय झालं आहे? तुझे गुडघे इतके काळे का आहेत? ती रक्ताची गुठळी आहे का?". 

या घटनेनंतर आपण नैराश्यात गेले होते असाही खुलासा शांती प्रियाने केला आहे. शांती प्रियाने म्हटलं आहे की, "मी त्यावेळी 22-23 वर्षांची होते. मी त्यानंतर नैराश्यात गेले होते. पण त्यावेळी माझी आई माझं भक्कमस्थान होती. याचं कारण आम्ही इंडस्ट्रीत अशा गोष्टींचा आधीपासून सामना केला होता. मग ती दाक्षिणात्य इंडस्ट्री असो किंवा मग हिंदी. माझी बहिण भानूप्रियालाही अशा गोष्टींचा सामना करावा लागला होता. ती हिंदी चित्रपटांमध्ये काम करायची. भानूप्रियाच्या चेहऱ्यावर पिंपल्स असताना हिंदी इंडस्ट्रीतील काही मॅगझिनने त्यावर लिहिलं होतं. मॅगजिनने पिंपलवर चर्चाच केली होती. मला फार आश्चर्य वाटलं होतं. रंगामुळे मला फार सहन करावं लागलं आहे. आता माझ्या मुलांनाही ते सहन करावं लागतं". 

"मी अक्षय कुमारशी फार सहजपणे बोलू शकत नव्हते. मला वाटतं 'इक्के पे इक्का' चित्रपटाच्या सेटवरील तो माझा दुसरा शेवटचा दिवस होता. क्लायमॅक्स सीन शूट होत होता आणि चित्रपट संपणार होता," अशी माहिती शांती प्रियाने दिली आहे. दरम्यान अक्षय कुमारने आपली त्यासाठी कधीच माफी मागितली नाही असंही तिने सांगितलं. या चित्रपटात अनुपम खेर आणि मौसमी चॅटर्जीही प्रमुख भूमिकेत होते. 

"अक्षय कुमार माझी कधीच माफी मागितली नाही. पण त्याने मला आपण मस्करी करत आहोत, फार गांभीर्याने घेऊ नको असं सांगितलं. त्यावर मी ठीक आहे असं म्हटलं होतं," असं शांती प्रियाने सांगितलं.

ती पुढे म्हणाली, “अक्षय कुमारने माझी माफी मागितली नाही. मी कोणत्याही प्रकारे दुखावलं असेल तर मला माफ कर असं तो म्हणाला नाही. तो फक्त म्हणाला, ‘मी फक्त विनोद करत होतो'. पण त्याने एका अतीसंवेदनशील विषयाला हात लावला होता. मी त्याला ते सांगायला नको होते”. शांती प्रिया धारावी बँक या वेब सीरिजमध्ये अखेरची दिसली आहे. यामध्ये सुनील शेट्टी प्रमुख भूमिकेत होता.