अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी मोठी चोरी; लाखोंचे दागिने गायब झाल्याने नोकराला अटक

Actress Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी चोरीची माहिती समोर आली आहे. या चोरीमध्ये नेहाला लग्नाला मिळालेले दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चोराला अटक देखील केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 4, 2024, 02:40 PM IST
अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी मोठी चोरी; लाखोंचे दागिने गायब झाल्याने नोकराला अटक title=

Actress Neha Pendse : मराठी चित्रपटांपासून ते बॉलीवूड आणि टीव्हीपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री नेहा पेंडसेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात चोरी झाली आहे. नेहा पेंडसेच्या घरातून सहा लाखांचे दागिने गायब झाल्याची बातमी समोर येत आहे. चोरीची तक्रार नेहाचा पती शार्दुल सिंग बियास याच्या चालकाने पोलिसात दाखल केली आहे.  महत्त्वाची बाब म्हणजे  तपासादरम्यान पोलिसांनी नेहाच्या घरी काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

नेहा पेंडसेच्या मुंबईतल्या वांद्रे येथील घरात चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे पश्चिम येथील अरेटो बिल्डिंगच्या 23व्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये ही चोरी झाल्याचे चालक रत्नेश झा यांनी तक्रारीत म्हटले आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे 6 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये नेहाचे सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याची अंगठीही आहे. जी तिला चार वर्षांपूर्वी लग्नाची भेट म्हणून मिळाली होती. हे दागिने त्यांनी त्यांच्या बेडरूममधील कपाटात ठेवले होते. या चोरीमागे सुमितकुमार सोलंकी या व्यक्तीचा हात असल्याचा शार्दुलला संशय होता.

चोरीचा आरोप असलेली व्यक्ती नेहा पेंडसेच्या घरी अनेक प्रकारची कामे पाहते. आरोपी इमारतीच्या कॅम्पसमध्ये इतर कामगारांसह राहत होता. चोरी झाली त्या दिवशी शार्दुल दागिने काढण्यासाठी बेडरुममध्ये गेला होता. मात्र कपाटातून सर्व काही गायब होते. याबाबत त्यांनी घरात काम करणाऱ्या लोकांना विचारणा केली मात्र सर्वांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यांनी कामगारांची चौकशी केली असता सोलंकी बेपत्ता असून चौकशी केली. मात्र तो त्यांना न सांगता कुलाबा येथे नातेवाईकाच्या घरी गेल्याचे समोर आलं. यानंतर पोलिसांनी सुमितकुमार सोलंकी अटक केली. सुमितकुमारला अटक झाली असली तरी दागिने अद्याप सापडलेले नाहीत.

याबाबत विचारले असता, नेहा पेंडसेने स्पष्टीकरण दिलं आहे. "मला याबद्दल बोलणे सोयीचे वाटत नाही. ही बातमी कशी लीक झाली हे मला माहीत नाही, मी खूप अस्वस्थ होते. होय माझे घर लुटले गेले. जे काही बोलले जात आहे ते खरे आहे," असे नेहा पेंडसेने म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री नेहा पेंडसे नेहा पेंडसे मे आय कम इन मॅडम मधील संजना हितेशीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे? जून या मराठी चित्रपटातील तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक देखील केलं आहे. 2018 मध्ये, तिने बिग बॉस 12 मध्ये भाग घेतला आणि 29 व्या दिवशी तिला बाहेर काढण्यात आले. 2021 मध्ये, तिने लोकप्रिय भाबीजी घर पर हैं मध्ये अनिता विभूती नारायण मिश्रा म्हणून सौम्या टंडनची जागा घेतली होती. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये तिने कार्यक्रम सोडला.