मुंबई : सोशल मीडियाच्या वर्तुळात दर दिवशी अनेक सेलिब्रिटींची खिल्ली उडवली जाते. त्यांचे फोटो, व्हिडीओ पाहून त्यावर चित्रविचित्र कमेंटही केल्या जातात. पण, एका टप्प्यावर गेल्यानंतर मात्र ट्रोलिंगचा हा मुद्दा डोईजड होतो आणि मग ज्याची खिल्ली उडवली जातेय, त्या व्यक्तीच्या संतापाचा भडका उडवतो.
कोणतीही महिला गरोदरपणाच्या काळात असंख्य शारीरिक बदलांना सामोरी जात असते. हे अगदी नैसर्गिक आहे. पण, अशा परिस्थितीतही महिलांची, गरोदर अभिनेत्रींची खिल्ली उडवणारे बुद्धिहीन असल्याची संतप्त प्रतिक्रिया या अभिनेत्रीनं दिली. (Actress Kratika Sengar on getting trolled during pregnancy )
ही अभिनेत्री म्हणजे, कृतिका सेंगर. गरोदरपणातील ट्रोलिंगबाबतची प्रतिक्रिया देताना क्रृतिका म्हणाली, 'सोशल मीडियावर गरोदरपणात वजन वाढलेलल्या अभिनेत्रींची खिल्ली उडवली गेल्याचं पाहिलं आहे. मला वाटतं या मंडळींना बुद्धीच नाही. तुमच्या शरीरात एक जीव वाढतोय, अशा परिस्थितीत शरीरात बदल होणार नाहीत याची अपेक्षाच करणं वेडेपणा आहे. लोक इथं या गोष्टीचा आनंद साजरा करण्यापेक्षा त्यात त्रुटी काढण्यातच वेळ वाया घालवतात.'
बरं, कृतिका गरोदर असूनही तशी दिसत नसल्यामुळंही काहींनी तिला धारेवर धरलं. यासंबंधी सांगताना इथं इंटरनेटवर लोकांना सर्वच गोष्टींची अडचण असते असं म्हणत तिनं परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली.
मी जेव्हा गरोदर नव्हते तेव्हा लोक मी गरोदर दिसते म्हणून हिणवत होते. आता अनेकजण म्हणतात मी गरोदर दिसतच नाही. काहींनीतर हद्दच केली. मी गरोदर दिसत नसल्यामुळं आम्ही सरोगसीच्या पर्यायाची निवड केल्याचंही काहींनी म्हटलं.
समाजाच्या मानसिकतेचा कल नेमका कुठं आहे, याचाच थांगपत्ता लागत नसल्याचा सूर कृतिकानं आळवला.