नाशिक : लोकसभा निवडणूकीच्या आधी अभिनेता सुबोध भावे यांनी पुण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती. सुबोध भावे हे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असल्याने त्यांची काँग्रेसच्या मंचावरील उपस्थित अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली होती. त्यानंतर आता सुबोध भावे यांनी यावर खुलासा केला आहे. 'राहुल गांधींची मुलाखत घेण्यासाठी मी पैसे घेतले असून हा माझा व्यवसाय आहे. मी एक शिवसैनिक आहे. राजकीय व्यक्तिमत्व म्हणून मी राहुल गांधींचा आदर करतो. सोशल मीडियावरुन त्यांच्याबद्दल काहीही बोललं जातं. पण देश सोशल मीडिया चालवत नाही. २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांच्यात बदल झाला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांतही ते काही वेगळे असतील' असं सुबोध भावेंनी म्हटलंय.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदानाआधी राहुल गांधींनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. सुबोध भावे यांनी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन केलं होतं. या कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. या चर्चेवर पडदा टाकत सुबोध भावेंनी मी काँग्रेसच्या व्यासपीठावर गेलो होतो. मात्र, त्यासाठी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतली असल्याचं सांगितलं होतं.
सुबोध भावेने मजेशीरपणे राहुल गांधींना मी तुमचा बायोपिक करत असल्याचे सांगितले. परंतु, या चित्रपटासाठी नायिका कोण हे अजून ठरलेले नाही. तेव्हा तुम्हीच एखाद्या नायिकेचे नाव सुचवा, असा प्रश्न विचारला होता. यावर राहुल यांनी मी सध्या माझ्या कामातच असल्याचं सांगितलं. त्यावर मी बायोपिकमध्ये तुमच्या नायिकेचे नाव 'वर्क' असे ठेवत असल्याचं सुबोध भावेंने मजेशीरपणे म्हटलं होतं.