शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकार देखील आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २००३ साली उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवल्यानंतर पक्षात अनेक जण नाराज झाले. त्यानंतर पक्षाचे मोठे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. पुढे जाऊन उद्धव ठाकरे यांनी अनेक महापालिकांवर भगवा फडकवला.
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाशीही युती न करता ६३ आमदार निवडून आणले. उद्धव ठाकरे यांनी पक्ष वाढवला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत युतीकडून १८ खासदार निवडून आणले. त्यानंतर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवत त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली. पुढे जाऊन ते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले पण सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका त्यांनी पार पाडली यामुळे ते सर्वाधिक चर्चेत राहिले. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर सतत टीका सुरु होती. राम मंदिराच्या मुद्द्यावर ते देशाच्या राजकारणात आणखीन चर्चेत आले. राम मंदिराच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अयोध्येचा दौरा देखील केला. सरकारने राम मंदिरा बांधण्यासाठी अध्यादेश आणावा, शिवसेना त्याला पाठिंबा देईल अशी थेट भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे देशाच्या राजकारणात त्यांनी आपला ठसा उमटवला.