चेन्नई : भारत-ऑस्ट्रेलियाची पहिली वनडे चेन्नईच्या एम.ए चिदंबरम स्टेडिअमवर सुरू आहे. सुरू असलेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन या सामन्यात खेळत नसल्याने सलामीवीर म्हणून रोहित शर्मासोबत अजिंक्य रहाणे मैदानात उतरला. रवींद्र जडेजाला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर २८२ रन्सचे आव्हान दिले आहे.
सलामीला उतरलेली रहाणे आमि रोहित शर्मा ही जोडी चांगली कामगिरी करु शकली नाही. रहाणेने १५ बॉलमध्ये ५ तर रोहित शर्माने ४४ बॉल्समध्ये २८ रन्स करुन बाद झाले. कॅप्टन विराट कोहली आणि मनीष पांडे हे भोपळाही न फोडता तंबूत परतले. केदार जाधवने डाव सावरण्याचा प्रयत्न करत ४० रन्स केले. हार्दीक पांड्याने धमाकेदार खेळी करत ऑस्ट्रेलिअन बॉलर्सच्या नाकी दम आणला. ५ सिक्स आणि ५ फोरच्या जोरावर त्याने ६६ बॉल्समध्ये ८३ रन्स केल्या. एम.एस धोनीने ८८ बॉल्समध्ये ७९ रन्स केले. भुवनेश्वर कुमारने ३० बॉल्समध्ये ३२ रन्स केले.