'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'

आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील 'कबीर सिंग' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Jun 12, 2024, 07:18 PM IST
'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...' title=

अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असणारा 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बरेच वाद झाले होते. यादरम्यान अभिनेते आदिल हुसैन यांनी कबीर सिंग चित्रपटात काम केल्याने आपल्याला पश्चाताप झाल्याचं विधान जाहीरपण केलं होतं. यानंतर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने त्यांना 30 आर्ट फिल्म्स आणि एक ब्लॉकबस्टर चित्रपट असा टोला मारला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा आदिल हुसैन यांनी दिग्दर्शकावर निशाणा साधला आहे. आपल्याला 100-200 कोटी दिले असते तरी 'अ‍ॅनिमल' चित्रपटात काम केलं नसतं असं विधान त्यांनी केलं आहे. 

Zoom ला दिलेल्या मुलाखतीत आदिल हुसैन यांनी अ‍ॅनिमल चित्रपटात भूमिका करायला आवडलं असतं का? अशी विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, "कधीच नाही. जरी त्यांनी मला 100-200 कोटी दिसले असते तरी मी ती भूमिका केली नसती".

आदिल हुसैन यांना यावेळी संदीप रेड्डी वांगाच्या 30 आर्ट फिल्म्स आणि एक ब्लॉकबस्टर चित्रपट या कमेंटविषयीदेखील विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सांगितलं की, "त्यावर मी काय बोलणार? मला वाटतं त्या कमेंटखाली अनेकांनी रिप्लाय केला आहे. जर तो अँग लीपेक्षा जास्त प्रसिद्ध असेल तर मला कल्पना नाही. काय बोलावं हे मला माहिती नाही. पण तो असा विचार करत असेल तर फार दुर्दैवी आहे. त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्याने त्याला असं वाटत असेल. मला कबीर सिंगने किती कमावले माहिती नाही, पण Life of Pi च्या कमाईशी स्पर्धा करु शकत नाही. त्याने हे बोलण्याआधी विचार करायला हवा होता". आदिल हुसेन यांनी Life of Pi आणि स्टार ट्रेक -डिस्कव्हरी अशा हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

“मला वाटत नाही की त्याच्या म्हणण्याला काही अर्थ आहे. त्याला राग आला, आणि त्याने ते विधान केलं. माझ्या विधानावर ही प्रतिक्रियात्मक टिप्पणी आहे. मला वाटत नाही की मी ते गांभीर्याने घ्यावे,” असंही आदिल हुसैन म्हणाले. 

आदिल हुसैन यांनी कबीर सिंग चित्रपट केल्याची आपल्याला खंत वाटते असं म्हटल्यानंतर त्यांच्यात आणि संदीप वांगा रेड्डी यांच्यात वाद सुरु झाला होता. एपी पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, “माझ्या आयुष्यातील हा एकमेव चित्रपट आहे ज्याची स्क्रिप्ट न वाचता, त्यावर आधारित तेलुगू चित्रपट न पाहता मी केला. मी दिल्लीत (कबीर सिंग) चित्रपट पाहायला गेलो होतो आणि 20 मिनिटांनंतर मला तो सहन झाला नाही मी तेथून बाहेर पडलो. आजपर्यंत मला त्याची खंत आहे. तो चित्रपट (कबीर सिंग) केल्याबद्दल मला पश्चात्ताप झाला आहे, कारण मला वाटते की तो चुकीचा आहे. यामुळे मला माणूस म्हणून खूप लहान वाटू लागले”.

त्यानंतर, संदीप रेड्डी वांगा यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं होतं की, “30 आर्ट फिल्म्समधील तुमच्या 'विश्वास'ला तुम्हाला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही जितकी 1 ब्लॉकबस्टर फिल्मचा 'खेद' आहे. तुमचा लोभ पॅशनपेक्षा मोठा आहे हे जाणून तुम्हाला कास्ट केल्याबद्दल मला खेद वाटतो. आता, एआयच्या मदतीने तुमचा चेहरा बदलून लाजेपासून वाचवीन".