मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : काय रे तुला माझा मराठवाडा दिसत नाही का..? असं सवतीच्या लेकरवानी का करतोयस रे? आम्ही पण माणसं आहोत. आम्हाला पण जीव आहे. आम्हाला पण पाण्याची गरज आहे.. पण तू तर त्या मोठमोठाल्या शहरातच बरसतोय, जिथे तुझी जास्त गरजच नाही.. माणसं भेदभाव करत असतात रे पण तुही भेदभाव करून आम्हाला तुझ्यापासून वंचित ठेवतोयेस का ? तुला आमची कीव येत नाही का?
मुंबई तुंबली, लोकल सेवा ठप्प, चाकरमान्यांना ऑफिसला जायला उशीर, पुण्यातील भिडे ब्रिज पाण्याखाली, झेड ब्रिजवरून भिडे ब्रिज पाहणाऱ्यांची गर्दी वाढली, नाशिकमध्ये पूर..
अन मराठवाड्यात....
मराठवाड्यात नुसतं काळेभोर ढग, त्यांच्याकडे बघून असं वाटत की तू आता असा बरसणार की, आता आमच्या शेतात, रानात, वनात, घरात पाणीच पाणी होईल.. पण, पण आमचं नशीब इतकं भारी कुठं?? पहिलंच इथल्या नेत्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आमचे जिल्हे मागासले. त्यात तुही पाठ फिरवतोस, एखाद्या दुष्मणावनी.. असं कारे? तुला आमची कीव येत नाही का??
आमचा शेतकरी बँकेतून कर्ज काढून, सावकाराकडून व्याजाने, नातेवाईकांकडून उसने पैसे घेत बी-बियाणे विकत घेऊन, घामच नव्हे तर रक्तसुद्धा गाळून पेरणी करतो. मात्र तू आमच्याकडे फिरकतच नाही. अरे त्या शेतकऱ्यांच्या घामाची तरी किंमत कररे. जितका त्यांचा घाम जमिनीवर पडलाय तितका तर तू सुद्धा बरसला नाहीयेस.. आमच्याशी तुझं काही वैर आहे का? का तुलाही त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावाणी टेबलाखालून लाच पाहिजे, का कोंबडे, बकऱ्यांचे बळी पाहिजे..?
पण तुझ्या वागण्यात तर असं दिसतं की तुला कोंबड्या, बकऱ्यांचे नव्हे, तर माणसांचे बळी हवेत.. पण तसं तू मागील अनेक वर्षांपासून आमच्याकडे पाठ फिरवून अनेक शेतकऱ्यांचे बळी घेतलेच आहेस की.. का इतक्यान तुझं मन भरलं नाही? का अजून तुला माझ्या बळीराजांचे देह लटकताना पहायचेत? का अजून तुला शेतकऱ्यांची लेकरं अनाथ झालेली पहायचेत..? बायकांचे कपाळ पुसलेले बघायचेत? सांग ना तुला आमची कीव येत नाही का??
बस्स रे, बस्स, यंदातरी असं वागू नको.. तुझ्याकडे दरवर्षी आम्ही आशेने पाहतो अन तू मात्र आमच्याकडे पार दुर्लक्ष करतो.. तुझी वाट पाहून- पाहून आता आम्ही थकलो आहोत. आता तरी आमची रिकामी ओंजळ भरून काढ. आमचा शेत हिरव्या शालूने पांघरून टाक. असा बरस की माझ्या शेतकऱ्यांचे सारे दुःख वाहून ने..
असा बरस की इथल्या नद्या, नाल्या, ओढे खळखळून वहावे, धरणे तुडुंब भरावे... आम्ही केलेल्या झाडांच्या कत्तलीच्या गुन्ह्याची ही सजा आहे हे पण आम्हाला माहीत आहे, पण आता यापुढे आमच्याकडून अशी चूक होणार नाही, आणि झालेल्या चुकीला मोठ्या मनाने माफ करून बरस बाबा एकदाचा! आमची कीव कर !