जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय 'कान्हेरी लेणी'

बोरीवली राष्ट्रीय उद्यानात आज बुद्धकालीन इतिहासची आठवण करुन देणारे जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय कान्हेरी लेणी... 

Updated: Sep 23, 2017, 03:13 PM IST
जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय 'कान्हेरी लेणी' title=

सिद्धार्थ कसबे

लेणी अभ्यासक, जुन्नर

बोरीवली राष्ट्रीय उद्यानात आज बुद्धकालीन इतिहासची आठवण करुन देणारे जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय कान्हेरी लेणी... सम्राट अशोकांचे मांडलिक सातवाहन राजांच्या कारकिर्दीत कोरलेला कान्हेरी हा बुद्धकालीन अनमोल लेणी समूह... सम्यक सांस्कृतिक संघ, मुंबई पाली विभाग, भारत लेणी संवर्धन समिती आणि मुंबई पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मला कान्हेरी लेण्यांची खूप सारी माहिती मिळाली.

कान्हेरी लेणीला भेट द्यायची माझी तीसरी वेळ... कारण होते मुंबई विद्यापिठात पाली मधे एम.फिल करत असलेले व भारतातील बुद्ध लेणी अभ्यासक माझे मित्र राहुल राव हे कान्हेरी लेणीस भेट देउन आलेले आणि त्यांनी त्यांचे फोटो फेसबुकवर टाकले होते... ते मी पाहिले पण त्यांनी जे फोटो टाकले होते ते मी प्रथमच पाहत होतो. या अगोदर मी दोन वेळेस कान्हेरीवर जाऊन आलो होतो पण मला हे ठिकान निदर्शनात आले नव्हते. मी त्यांना फोन करुन विचारले हे ठिकाण कोणते आहे तर माहिती मिळाली की हे निर्वाण गृह आहे जिथे त्या काळी ७५ अर्हन्त भिक्षुंचे विटामधील स्तुप आहेत. तेव्हा मी ठरवले की इथे आपण भेट दिली पाहिजे... आणि ठरल्याप्रमाने आम्ही बोरिवली राष्ट्रिय उद्यानाच्या प्रवेश द्वारावर भेटलो. प्रवेश तिकीट काढून आम्ही आत प्रवेश केला. प्रवेश द्वारापासून कान्हेरी लेणी  ७ की.मी अंतरावर आहेत. तिथे पोहचण्यासाठी उद्यानाच्या बस तसेच सायकलसुद्धा उपलब्ध आहेत.

कान्हासील / कान्हागिरी / कृषगिरी

कान्हेरी पर्वताचे नाव तेथील एका शिलालेखांत 'कान्हासील' असे दिले आहे. कान्हेरीला 'कान्हागिरी' किंवा 'कृषगिरी' असेही म्हटले आहे. येथे एकूण १२८ लेणी आहेत. १०७ विहार आणि ५ चैत्यगृह आहेत. इसवी सन पूर्वी दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन नंतर ११ व्या शतकापर्यंत म्हणजे तेराशे वर्षे या लेणी तयार करण्याचे काम चालू होते. हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना तेथे तोफांची नेमबाजी कवायत चालत असे. त्यामुळे तेथील बऱ्याच लेण्यांचे नुकसान झाले आहे. इसवी सन १७१६ ते १७२० साली मुंबई प्रातांचा राज्यपाल असताना 'बून'ने कान्हेरी येथील लेण्यांचा सखोल अभ्यास केला. त्याच्या मते कान्हेरी येथील लेणी खोदून सर्व दृष्टीने पूर्ण करण्यास ४० हजार माणसे सतत ४० वर्षे खपली असली पाहिजेत. या अंदाजावरुन २ हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अत्यंत साध्या साधनांचा उपयोग करुन एक लेणी पूर्ण करण्यास किती वेळ, काळ आणि खर्च येत असावा, याची कल्पना येते.

बौद्ध विश्वविद्यालय

कान्हेरी इसवी सन पूर्वी २०० वर्षांपासून इसवी सनानंतर १३ व्या शतकापर्यंत म्हणजे जवळ जवळ १५०० वर्षे भरभराटीस आलेले बौद्ध विश्वविद्यालय होते. लेणी प्रवेश द्वारावर पुरातत्व खात्याचे तिकीट काढून आम्ही पुढे गेलो. समोरच भव्य अशी लेणी पहायला मिळते. लेणी क्रमांक २ मधे दगडामध्ये कोरलेले स्तुप आहेत... स्तुपाभोवती बुद्धांच्या, वज्रपानि, पद्मपाणी, अवलोकितेश्वर यांच्या मूर्ति कोरलेल्या आहेत. लेणी क्रमांक ३ ही सर्वात मोठी लेणी असून त्यामधे एक खूप मोठा चैत्य स्तूप आहे. तसेच बाजुला जे खांब आहेत त्या खांबावर राजा आणि राणी हे बुद्ध प्रतिके, बोधिवृक्ष, सिरिपाद, स्तूप यांची हत्तींवर येउन पूजा करत असतानाचे खूप सुंदर शिल्प कोरलेले आहेत. लेणी प्रवेशद्वाराच्या बाजुला २ अतिभव्य ३२ फूट उंचीच्या बुद्ध मूर्ति आपणास दिसतात. तसेच बुद्धांच्या अनेक प्रकारच्या ध्यान मुद्राही लेणी प्रवेश भिंतीवर कोरलेली आहेत. ज्या सातवाहन राजांनी या लेणिस दान दिले त्या राजा, राणींची शिल्पेसुद्धा पहायला मिळतात. लेणी समोरच अरहंत भिक्षु सारिपुत्त यांचा अस्थिस्तुप आहे त्याचे काही विटाचे अवशेष आज शेष आहेत.

३८ नंबरच्या लेण्यांमध्ये आणि आसपास जवळ जवळ ६०० फूट लांबीच्या गॅलरीमध्ये विटांनी बांधलेले पण आता उद्ध्वस्त झालेले अनेक स्तूप आहेत. लुटारुंनी ते तोडून आतील किंमती वस्तू पळविलेल्या दिसतात. कान्हेरी येथील एका स्तुपात सापडलेल्या वस्तू आणि ताम्रपटाची माहिती व ८४ नंबरच्या लेण्याच्या पुढे नदीच्या उत्तरेच्या बाजूस भट्टीचे अस्तित्व दिसून येते. ह्यावरुन तेथे लोखंड आणि धातू करुन त्याचे पदार्थ वापरात आणले जात असावेत असे वाटते.


कान्हेरी गुंफा

पाण्याची व्यवस्था आणि ग्रंथालय

पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी लेणी समोरील हौदांमधे साठवण्यासाठी डोंगरामध्ये एक पाणी वाहन्यासाठी एक नळी खोदून ते बरोबर हौंदापर्यंत आणलेले आपल्याला दिसतात आणि जवळ जवळ प्रत्येक लेण्याला खेळते पाणी पुरविण्याची व्यवस्था, तसेच लेण्यांच्या बाहेरच्या जागेत बसण्यासाठी असलेली दगडी बाके, एका लेण्यापासून दुसऱ्या लेण्याकडे जाण्यासाठी असलेला मार्ग, पायऱ्याचे जिने आणि जिन्यावरुन चढता उतरताना हातांनी धरण्यासाठी केलेले कठडे ही कान्हेरीच्या लेण्यांची वैशिष्टे आहेत. हे विश्व विद्यालय हे जगातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी अध्यापनासाठी प्रसिद्ध होते. कान्हेरीसुद्धा एक तक्षशिला आणि नालंदासारखे एक जग प्रसिद्ध विश्वविद्यालय होते. तेथील ग्रंथालयाला दिलेल्या देणग्यांचा उल्लेख शिलालेखांत आला आहे. अनेक देणगीदारांनी कान्हेरी येथे ग्रंथालयासाठी देणग्या दिलेल्या आहेत.

पहिल्या ओमघवर्षाच्या कारकिर्दीत नवव्या शतकाच्या सुरुवातीला भद्रविष्णूने आपल्या देणगीपैंकी काही ग्रंथ खरेदीसाठी दिली आहे. तसेच अविघ्नकार नावाच्या एका बंगाली व्यापाऱ्याने कान्हेरीच्या संघास ग्रंथ खरेदीसाठी दान केल्याची नोंद आहे. ६६ नंबरच्या एका भिंतीवर जापानी शिलालेख कोरलेला दिसतो त्यात निचिरेने बौद्ध पंथातील एक जपानी प्रवाशाने भेट दिल्याची नोंद आहे. दरबार हॉल विद्यालयाचे सभागृह म्हणून वापरला जात असावा. कान्हेरी येथील लेण्यांतील ताम्रपट आणि शिलालेख कान्हेरी येथील लेण्यांत डॉ. जेम्स बर्ड यांना १८३९ मध्ये २ ताम्रपट सापडले. यासंबंधीची माहिती त्यांच्या शब्दात, 'पाहणी करण्यासाठी म्हणून सर्वांत मोठा स्तूप निवडला. तो एके काळी १२ किंवा १६ फूट उंचीचा असावा. तो घडीव दगडांचा असून त्याची बरीच पडझड झाली होती. वरुन खाली जमिनीपर्यंत खोदल्यानंतर आणि दगड, माती बाजूला काढल्यानंतर कामगारांना एक वर्तुळाकार दगड सापडला. तो मध्ये पोकळ असून वर जिप्समच्या तुकड्याने झाकला होता. त्या दगडात तांब्याचे दोन लहान कलश होते. एका कलशामध्ये थोडी रक्षा, एक रुबी ( लाल ) एक मोती, सोन्याचे लहान तुकडे आणि सोन्याची एक लहान पेटी होती. त्या पेटीत वस्त्राचा एक तुकडा होता. दुसऱ्या कलशात एक चांदीची पेटी आणि थोडी रक्षा होती. त्या कलशांच्या जवळच लथ लिपीतील किंवा लेण्यावरील लेखासाठी वापरण्यात येणाऱ्या लिपीतील २ ताम्रपट होते.'

स्मशान गुंफा किंवा निर्वाण गृह

कान्हेरी शिलालेखामुळे सांस्कृतिक इतिहासात भर कान्हेरीचे शिल्प व तेथील शिलालेख यामुळे भारताच्या सांस्कृतिक इतिहासात फार मोलाची भर पडली आहे. कान्हेरीच्या १२८ लेणी या  बौद्ध भिक्षू-भिक्षूणींना राहण्यासाठी बांधल्या होत्या. आम्ही कान्हेरीला ज्यासाठी गेलो होतो ते ठिकाण म्हणजे ७५ अर्हन्त भिक्षुंचे निर्वाण स्तुप... त्या ठिकाणाला 'स्मशान गुंफा' किंवा 'निर्वाण गृह' असे म्हणतात कान्हेरी लेणीवर खूप सारे पर्यटक येत असतात. परंतु या निर्वाण गुंफेकड़े कोणीही जात नाही. डोंगरात कोरलेल्या पायऱ्यांनी आम्ही या ठिकाणाच्या प्रवेश ठिकाणी पोहचलो. तिथे बुद्धांच्या पाय त्याला पाली भाषेत 'सिरिपाद' म्हणतात... ते कोरलेले दिसले त्याच्या बाजुलाच 'निर्वाण गृह' असे ब्राम्ही भाषेत कोरलेले दिसले. त्यानंतर पुढे भाजलेल्या विटांमधे खूप सारे स्तुपांचे अवशेष पाहिले आपल्या महाराष्ट्रात स्तुप हे दगडात कोरलेले सापडतात. परंतु कान्हेरीतील स्तूप हे विटामध्ये बांधलेले आहेत. असे स्तुप सम्राट अशोकानं बुद्ध अस्थिंवर उभारलेले आपणास दिसतात. तसेच नालंदा, तक्षशिला या ठिकाणीही या प्रकारचे स्तुप अस्तित्वात आहेत. या परिसरात खुपच शांतता अनुभवास येते. जंगलातील पक्षांचा किलबिलाट, वाऱ्याचा आवाज याने मन शांत होते आणि बाजुलाच अर्हन्त भिक्षुंचे स्तूप... स्तुपाच्या हर्मिका या बाजुलाच पडलेल्या दिसल्या. इथे तीन बुद्ध विहाराचे भग्नावशेष दिसतात. तसेच भग्न झालेले दगडी स्तुप पहावयास मिळाले.

या स्तूपावर २२ शिलालेख उपलब्ध झाले आहेत. त्यात बौद्ध आचाऱ्यांची नावे व त्यांच्या पदव्या आढळतात. हे पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. खाली लेणीसमोरच थाइलैंड आणि चीनचे बौद्ध भिक्षु आमच्या नजरेस पडले. त्यांना समोर पाहून एक वेळ असे वाटले की २००० वर्षांची कान्हेरी पुन्हा जीवंत झालीय. आम्ही भिक्षुंना वंदन केले. त्यातील चीनच्या भिक्षुंनी आम्हाला धम्म सांगितला आणि त्याना वंदन करुण आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. बाहेरच्या देशातून लोक या लेणी पहायला येतात आणि आपण आपल्या जवळ असूनही जात नाहीत.


कान्हेरी गुंफा

बुद्ध धम्म आणि महाराष्ट्र

बौद्ध कान्हेरीला कसे पोहचले याचे विश्लेषण करताना डॉ. गोखले म्हणाल्या, 'सम्राट अशोकांने काही भिक्षू सिलोनला पाठविले ते उज्जयिनी, कल्याण, सोपारा या मार्गाने कान्हेरीला आले. वाकाटकांकडे त्यांना राजाश्रय मिळाला.' गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या कारकिर्दीत येथील विहार गजबजलेले होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडण-घडणीत बुद्ध धम्माचा फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात बुद्ध धम्माचा प्रवेश इसवी सनापूर्वी पाचव्या शतकात झाला तेव्हापासून सतत एक हजार पाचशे वर्षे बुद्ध धम्माची शिकवण महाराष्ट्रीयांना मिळाली आहे. या शिकवणीत व्यक्ती विकासावर फार भर दिला आहे. व्यक्ती विकासाच्या किंवा समाज विकासाच्या आड येईल अशी एकही गोष्ट बुद्ध धम्मात नाही. व्यक्तीने प्रयत्न केला तर ती स्वत: बुद्धत्वापर्यंत आपला विकास करु शकते. अशा तऱ्हेचे प्रोत्साहन बुद्ध धम्मात दिले जाते. अशा शिकवणीतून जी महाराष्ट्र संस्कृती निर्माण झाली तिने जुन्नर, कार्ले भाजे, कान्हेरी आणि अजंठा ऐलोरासारखे जगाला थक्क करणारे वास्तुशिल्प निर्माण केले, त्या संस्कृतीचा वारसा आपल्याला मिळाला आहे. बोधी म्हणजेच ज्ञान, म्हणूनच बोरीवली न म्हणता 'बोधीवली' म्हणणेच उचित ठरेल. त्यादृष्टीने आवाज बुलंद झाला पाहिजे आणि परिवर्तनाचे चक्र गतीमान झाले की इतिहास निर्माण करणारे इतिहास विसरु शकत नाहीत, हे सिद्ध होईल.

(नोट : लेखातील सर्व मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत)