जगातील सर्वात मोठा साप शास्त्रज्ञांना सापडला आहे. ॲमेझॉन जंगलाच्या मध्यभागी शास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठा साप सापडला असून तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक्सच्या डिस्नी+ ची मालिका 'पोल टू पोल' च्या शुटिंगदरम्यान हा साप आढळला आहे. टीव्ही वन्यजीव प्रस्तुतकर्ता, प्रोफेसर फ्रीक वोंकला हा महाकाय ॲनाकोंडा सापडला आहे. आतापर्यंत कोणत्याही कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख नव्हता. हा ॲनाकोंडा 26 फूट लांब असून, 400 पौंड आहे. त्याच्या डोक्याचा आकार माणसाइतका असल्याचं वृत्त इंडिपेंडंटने दिलं आहे. सापाची ही प्रजाती जगातील सर्वात मोठी आणि वजनदार असल्याचं सांगितलं जात आहे.
नॅशनल जिओग्राफिक्सच्या डिस्नी+ ची मालिका 'पोल टू पोल' मध्ये सापाची ही प्रजाती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संशोधकांनी सापाच्या या प्रजातीला Eunectes akayima हे लॅटिन नाव दिलं आहे. याचा अर्थ नॉर्थन ग्रीन ॲनाकोंडा असा होतो.
प्रोफेसर वोंकने इंस्टाग्रामला सापाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो अत्यंत निर्धास्तपणे पाण्यात महाकाय ॲनाकोंडाच्या बाजूला पोहत आपला नवा शोध दाखवताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, "मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात मोठा ॲनाकोंडा तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. कारच्या टायरएवढा जाड, 8 मीटर लांब आणि 200 किलो वजन. डोकं माझ्या डोक्याएवढं मोठं आहे. मी आश्चर्यचिकत असून, हा एक मॉन्सटरच आहे".
विशेष म्हणजे, हे ॲनाकोंडा अनेकदा त्यांच्या शिकारीपेक्षा वेगाने हालचाल करतात. आपल्या मजबूत शरीराचा वापर गुदमरण्यासाठी आणि शिकार संपूर्ण गिळण्यासाठी करतात.
पूर्वी, ॲमेझॉनमध्ये ग्रीन ॲनाकोंडाची फक्त एक प्रजाती असेल असं वाटत होतं. ज्याला जायंट ॲनाकोंडा असेही म्हणतात. पण वोंक आणि त्यांच्या नऊ देशांतील 14 इतर शास्त्रज्ञांच्या टीमने उत्तरेकडील ग्रीन ॲनाकोंडा ही ग्रीन ॲनाकोंडापासून पूर्णपणे वेगळी प्रजाती असल्याचा निष्कर्ष काढला.
डायव्हर्सिटी जर्नलमध्ये वर्णन केलेल्या नवीन प्रजाती, 10 दशलक्ष वर्षांपूर्वी पूर्वीच्या ज्ञात दक्षिणेकडील ग्रीन ॲनाकोंडापासून वळल्या होत्या, ज्या त्यांच्यापेक्षा अनुवांशिकदृष्ट्या 5.5 टक्के भिन्न होत्या. "अनुवांशिकदृष्ट्या हा फरक खूप मोठा आहे. अनुवांशिकदृष्ट्या ते साडेपाच टक्के वेगळे आहेत. संदर्भासह सांगायचं झालं तर, आपण चिंपाजीपेक्षा सुमारे दोन टक्के वेगळे आहोत," असं या मोहिमेचे प्रमुख ब्रायन फ्राय यांनी सांगितलं आहे. ते क्वीन्सलँड विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ आणि संशोधनाचे सह-लेखकही आहेत.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा शोध ॲनाकोंडाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा आहे. हे सर्वात मोठे शिकारी आहेत आणि त्यांच्या परिसंस्थेमध्ये संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.