जीनिव्हा: कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या किंवा कोरोनाशी लढण्यासाठी शरीरात आवश्यक अँटीबॉडीज असलेल्या व्यक्तीला विषाणूची लागण होणारच नाही, याची कोणतीही शाश्वती नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) स्पष्ट करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या परिपत्रकात एखादी व्यक्ती कोरोनापासून सुरक्षित आहे (risk-free certificates) किंवा संबंधित व्यक्तीच्या अंगात कोरोनाशी लढण्यासाठी लागणारी रोगप्रतिकारक शक्ती (immunity passports) असल्याची प्रमाणपत्रे न देण्याविषयी बजावले आहे. त्यामुळे उलट कोरोनाच्या प्रसाराचा धोका आणखी वाढेल. कारण, एकदा बरे झाल्यानंतर संबंधित व्यक्ती कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तितकीशी काळजी घेणार नाही, असे WHO ने परिपत्रकात म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात चिली सरकारने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना हेल्थ पासपोर्ट देण्याचा मानस व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर WHOकडून हा खुलासा करण्यात आला आहे. अमेरिकन सरकाने अशाप्रकारची प्रमाणपत्रे वाटल्यास संबंधित व्यक्तीला प्रवास करण्याची किंवा कामावर जाण्याची परवानगी मिळेल. मात्र, कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा त्या विषाणूची लागण होणारच नाही, याचा कोणताही ठोस पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. त्यामुळे याबाबत काळजी घ्यावी, असा अप्रत्यक्ष इशारा WHOने ट्रम्प सरकारला दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या पाटण जिल्ह्यातही असाच एक प्रकार समोर आला होता. साधारण आठवडाभरापूर्वी दोन रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. यानंतर हे रुग्ण १४ दिवस होम क्वारंटाईन होते. मात्र, १४ दिवसांनी केलेल्या चाचणीत ते पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.