Vivek Ramaswamy: कोण आहेत अमेरिकेतील सर्वात चर्चित हिंदू नेते विवेक रामास्वामी? संपत्ती वाचून हैराण व्हाल

Who is Vivek Ramaswamy: भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आयोवा कॉकसमधील खराब कामगिरीनंतर त्यांनी आपलं नाव मागे घेतलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 16, 2024, 02:19 PM IST
Vivek Ramaswamy: कोण आहेत अमेरिकेतील सर्वात चर्चित हिंदू नेते विवेक रामास्वामी? संपत्ती वाचून हैराण व्हाल title=

Who is Vivek Ramaswamy: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. याचं कारण विवेक रामास्वामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. विवेक रामास्वामी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. विवेक रामास्वामी यांनी 2024 च्या रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीतील पहिली स्पर्धा आयोवा कॉकसमधील खराब कामगिरीनंतर आपण मोहिमेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. यानंतर ते आपल्या पक्षाचे दुसरे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत आहेत.

"आज रात्री मला सत्याचा सामना करावा लागला आहे. माझ्यासाठी हे स्विकारणं फार कठीण होतं. पण आम्ही सर्व तथ्य तपासून पाहिली आहेत. आम्हाला अपेक्षित निकाल मिळालेला नाही. यामुळेच मी राष्ट्राध्यक्षपदासाठी सुरु असलेला प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे," असं विवेक रामास्वामी म्हणाले.

आपली प्रचारमोहीम थांबवत असल्याचं जाहीर करताना विवेक रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला. "मी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करुन त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आतापासून माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल. डोनाल्ड ट्रम्प पुढील राष्ट्राध्यक्ष असतील यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु," असं त्यांनी सांगितलं.

कोण आहेत विवेक रामास्वामी?
 

विवेक रामास्वामी भारतीय वंशाचे आहेत. ते अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील याच पक्षाचे आहेत. विवेक रामास्वामी यांचं वय 38 वर्षं आहे. त्यांचा जन्म अमेरिकेच्या ओहियामध्ये झाला. त्यांचे आई-वडील भारतातून स्थलांतरित होते. विवेक यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यांनी येल लॉ स्कूलमधून आपलं शिक्षणही पूर्ण केलं आहे.

विवेक रामास्वामी एक यशस्वी उद्योजक

विवेक रामास्वामी यांची गणना अमेरिकेतील यशस्वी उद्योजकांमध्ये केली जाते. रामास्वामी यांनी पदवीपूर्वीच हेज फंड गुंतवणूकदार म्हणून लाखो डॉलर्स कमावले होते. 2014 मध्ये विवेक रामास्वामी यांनी स्वतःची बायोटेक कंपनी सुरु केली. त्यांनी 2021 मध्ये कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. तथापि, ते 2023 पर्यंत अध्यक्ष राहिले. रामास्वामी हे स्ट्राइव्ह अॅसेट मॅनेजमेंटचे सह-संस्थापक देखील आहेत.

विवेक रामास्वामी यांची एकूण संपत्ती किती?

मीडिया रिपोर्टनुसार, विवेक रामास्वामी यांची एकूण संपत्ती जवळपास 950 मिलियन डॉलर्स आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 7 हजार 484 कोटी रुपये आहेत. अमेरिकेतील 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या श्रीमंतांमध्ये विवेक रामास्वामी यांची गणना होते.