पक्ष्यांच्या धडकेने विमानाच्या इंजिनला लागली आग; विमानात होते 122 प्रवासी

Plane Accident : जपानमधल्या विमान अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पक्षाने धडक दिल्याने विमानाच्या इंजिनने पेट घेतला होता. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

आकाश नेटके | Updated: Jan 15, 2024, 07:45 PM IST
पक्ष्यांच्या धडकेने विमानाच्या इंजिनला लागली आग; विमानात होते 122 प्रवासी title=

Plane Accident : गेल्या काही महिन्यांपासून विमान अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या विमान अपघातांमध्ये अनेक प्रवाशांना जीव देखील गमवावा लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत बोईंग कंपनीचे विमान 16 हजार फुटांवर असताना त्याची एक खिडकी निघून हवेत उडाली होती. त्यामुळे बोईंग कंपनीच्या विमानांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशातच आता जपानमध्ये विमान हवेत असतानाचा मोठा अपघात घडला आहे. बोईंग कंपनीचे विमान हवेत असताना त्याने अचानक पेट घेतला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या विमानामध्ये 122 प्रवासी प्रवास करत होते.

122 प्रवाशांना घेऊन उडणाऱ्या जपानमधील एका विमानाला पक्ष्याने धडक दिल्याने मोठा अपघात घडला आहे. पक्षाच्या धडकेनंतर विमानाच्या इंजिनने पेट घेतला होता. त्यानंतर आग भडकल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. गेल्या आठवड्यात बुधवारी रात्रीच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जपानमधील हे विमान दक्षिण कोरियातील इंचॉन विमानतळावर उतरत असताना अडचणीत सापडले होते.

उड्डाणाच्या वेळी विमानाच्या स्टारबोर्डच्या बाजूला पक्षी आदळल्याने इंजिनला आग लागली होती. टेवे एअरच्या बोईंग 737-800 या विमानासोबत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना घडली तेव्हा विमानामध्ये 122 प्रवासी होते. इंजिनला आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बघता बघता संपूर्ण विमानाने पेट घेतला. त्यानंतर तात्काळ विमानाची लॅंडिंग करण्यात आली. त्यामुळे सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला आहे. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. माध्यमांच्या वृत्तानुसार, विमान दक्षिण कोरियातील इंचॉन विमानतळावर रात्री 9.30 वाजता उतरणार असताना ही घटना घडली.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, उड्डाणाच्या वेळी एका पक्ष्याने विमानाच्या स्टारबोर्ड इंजिनला धडक दिली, ज्यामुळे इंजिनला आग लागली. इंजिनमधून ज्वाळा निघू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. विमानाच्या आणि हवेच्या वेगामुळे इंजिनला लागलेली आग जवळपास विमानाच्या मागील भागापर्यंत पोहोचली. त्यानंतर पायलटने प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा जीव वाचवण्यासाठी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. 

दरम्यान, आता विमानाला आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमानातल्या प्रवाशांनी फ्लाइटच्या लँडिंगदरम्यानचा व्हिडिओही आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हिडीओमध्ये विमान लँडिंग करत असताना ज्वाला बाहेर पडताना दिसत होत्या.