Trending News : जगाच्या पाठीवर दर दिवशी असंख्य संशोधनं होत असतात. अनेक नवनवीन गोष्टी जगासमोर येत असतात. या त्याच गोष्टी असतात ज्या पाहून आपण पुरते थक्क होऊन जातो. कारण, खरंच असं शक्य आहे का? हा एकच प्रश्न आपल्या मनाच घर करून गेलेला असतो. असंच एक संशोधन नुकतंच झालं असून, थेट सुपरमार्केटपर्यंत त्याचे पडसाद उमटले आहेत.
सध्या ऑस्ट्रेलियातील (Australia) बऱ्याच दुकानांमध्ये एक नव्या पद्धतीचा मासा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. बरं, हा मासा असूनही त्यानं कधीच पाण्याला स्पर्शही केलेला नाही. कारण, हा मासा प्रयोगशाळेत जन्माला आला असून, हा 3D प्रिंटेड मासा एका प्रकारच्या बुरशीपासून तयार करण्यात आला आहे. सॅमन माशापासून प्रेरणा घेत हा तुकडा तयार करण्यात आला आहे.
व्हिएन्नातील रेवो फूड्स नावाच्या एका स्टार्टअप कंपनीनं हा मासा तयाल केला आहे. 'THE FILET' असं नाव या माशाला देण्यात आलं असून, त्यामध्ये प्रथिनांचं मुबलक प्रमाण असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हीगन माशाच्या तुकड्यामध्ये व्हिटामिनचंही बरंच प्रमाण असून, तो ओमेगा 3 फॅटी अॅसिडनं परिपूर्ण आहे. बरं, या माशाचा आणखी एक गुण म्हणजे जागतिक स्तरावर सागरी मस्त्यव्यसायावर असणारा ताणही त्यामुळं भविष्यात कमी होईल. कारण, या माशाच्या निर्मितीसाठी किमान गोष्टींची गरज लागत आहे.
हा मासा तयार करण्यासाठी 77 ते 86 टक्के कार्बन डायऑक्साईड आणि 95 टक्के कमी पाण्याचा वापर होत आहे. राहिला प्रश्न या माशाच्या एका फिलेच्या म्हणजेच एका तुकड्याच्या किमतीचा तर, यासाठी €2,99 EUR म्हणजेच, भारतीय चलनानुसार 265.954520 रुपये मोजावे लागत आहेत. भारतात आता हा मासा कधी विक्रीसाठी येणार ठाऊक नाही. पण, जागतिक स्तरावर मात्र त्याचं कौतुकच होत आहे हे मात्र खरं.
रेवो फूड्सनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या माशाचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. माशाचा एक तुकडा शिजताना आणि शिजल्यावर नेमका किती सुरेख दिसतो हेच इथं पाहायला मिळत आहे. बरं, जी मंडळी शाकाहारीच खातात त्यांनासुद्धा हा मासा मांसाहाराचा आनंद देऊ शकणार आहे. त्यामुळं त्याच्या कुतूहलात भरच पडताना दिसत आहे.