Ramayana Trail Video : रामाच्या वनवासापासून रावणानं सीताहरण करेपर्यंत आणि तिथपासून मारुतीरायानं लंकादहन करण्य़ापासून कूटनिती रचणाऱ्या रावणाचा रामाच्या हातून वध होईपर्यंतचे अनेक संदर्भ रामायणातून मांडण्यात आले. हेच रामायण विविध रुपांतून आजवर आपल्यापर्यंत पोहोचलं. त्यातच आता एका कमाल माध्यमाची भर पडली आहे. हे माध्यम इतकं प्रभावी ठरत आहे, की अवघ्या पाच मिनिटांत रामायणाचं संक्षिप्त रुप सर्वांपुढे अतिशय कल्पक आणि कलात्मकरित्या सादर करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर सध्या या अनोख्या रामायणाचा एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे.
रामायणाचे संदर्भ सांगणारी श्रीलंकेतील ठिकाणं नेमकी कुठे आहेत आणि आज ती ठिकाणं नेमकी कोणत्या नावानं ओळखली जातात याचच चित्रण या व्हिडीओमध्ये करण्यात आलं आहे. श्रीलंकन एअरलाईन्सचा हा एक जाहिरातपर व्हिडीओ असला तरीही तो ज्या पद्धतीनं सादर करण्यात आला आहे ते पाहून नेटकरी भारावत आहेत.
एक आजी तिच्या नातवाला रामायणातील प्रसंगांचं कथन करते, सोबतीनंसमोर असणाऱ्या चित्रांचा ती आधार घेते. रामायणाची कथा सांगितली जात असतानाच प्रत्यक्षात ही ती ठिकाणं नेमकी कशी दिसतात याचीही झलक सर्वांनाच पाहायला मिळत आहे. अशा या अनोख्या आणि अद्वितीय प्रवासावर जाण्याची संधी अर्थात या 'The Ramayana Trail' ची संधी सध्या श्रीलंकन एअरलाईन्स देत असून, एक अनोखा वारसा जपण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न कौतुकास पात्र ठरत आहे.
SriLankan Airlines च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जिथं सुट्टीच्या निमित्तानं चक्क पुराणकथांमधील प्रदेश, ठिकाणं आणि प्रत्यक्षात या कथा अनुभवण्याची संधी मिळतेय असंच स्पष्ट होतंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांनीच शेअर करत श्रीलंकेच्या सौंदर्याविषयी कुतूहल व्यक्त केलं आहे. काहींनी तर, इतर ठिकाणी जायचे बेत दूर सारत थेट लंका गाठण्याचाच निर्णय घेतला आहे.
Relive the epic of The Ramayana Trail
Embark on a journey through Sri Lanka’s legendary landscapes with SriLankan Holidays, offering a fully customized experience tailored just for you. Every step of your adventure is designed to bring out the grandeur and glory in the ancient… pic.twitter.com/jctUhc4JKn
— SriLankan Airlines (@flysrilankan) November 8, 2024
सहसा पर्यटनाच्या निमित्तानं काही खास ठिकाणांना भेट देण्याकडे अनेकांचाच कल असतो, पण इथं श्रीलंकन एअरलाईन्सनं ही खास जाहिरात करत भारतीयांची मनं खऱ्या अर्थानं जिंकली असं म्हणणं गैर ठरणार नाही. असा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही झाली ना श्रीलंकेला जायची इच्छा?