Medical Negligence Case: वैद्यकीय बेजबाबदारपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 36 वर्षीय महिलेवर 18 वर्षांपूर्वी झालेल्या प्रसुती शस्रक्रीयेमध्ये गोंधळ झाल्याची बाब समोर आली आहे. या महिलेची प्रसूती झाली तिने बाळाला जन्म दिल्यानंतर डॉक्टर चुकून एक सुई या महिलेच्या योनीमध्येच विसरल्याचं 18 वर्षांनंतर समोर आलं आहे. पाविना फाऊंडेशनने हा प्रकार नुकताच समोर आणला आहे. महिला आणि लहान मुलांसाठी काम करणाऱ्या या फाऊंडेशनने वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णांप्रती रुग्णालयांबरोबर डॉक्टरांनीही उत्तरदायित्व ठेवायला हवं हे अशा प्रकरणांमधून समोर येत असल्याचं फाउंडेशनचं म्हणणं आहे.
हा सारा धक्कादायक प्रकार थायलंडमधील नारथीवत प्रांतामधील रुग्णालयात घडल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या जन्मानंतरच्या वैद्यकीय उपाचारादरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून चुकून माझ्या योनीमध्ये ही यू आकाराची सुई राहिली.राहिलेली सुई बाहेर काढण्याऐवजी अधिक रक्तस्राव होईल असं सांगून त्यांनी जखमेवर उपचार केल्याचा या महिलेचा दावा आहे.
या राहिलेल्या सुईमुळे मागील जवळपास दोन दशकं या महिलेच्या ओटीपोटात दुखायचं. मात्र आपल्याला या वेदना का होत आहेत याची या महिलेला कल्पना नव्हती. मागील वर्षी या महिलेनं सरकारी रुग्णालयामध्ये एक्सरे काढला असता त्यामध्ये तिच्या योनीत प्रसूतीच्या वेळी राहिलेली सुई दिसून आली आणि या दुखण्यामागील खरं कारण समोर आलं.
या महिलेच्या शरीरात राहिलेली ही सुई यु आकाराची असल्याने ती एकाच जागी स्थिर राहत नाही. याच कारणामुळे एकदा दोनदा नाही तर तीन वेळा तिच्यावरील नियोजित शस्रक्रीया पुढे ढकलावी लागली. मागील वर्षभरापासून महिन्यातून चार वेळा या महिलेला या सुईची स्थिती काय आहे याची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात जावं लागतं. या प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेता ते सोंगखाला प्रांतातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे वर्ग करण्यात आलं आहे.
या साऱ्या प्रकाराचा महिलेला मोठा मनस्ताप झाला आहे. शारीरिक त्रासाबरोबरच महिलेला नियमितपणे रुग्णालयात जावं लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळेच या महिलेने पाविना फाऊंडेशनची मदत घेतली. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याची संपूर्ण थायलंडमध्ये चर्चा असून सदर रुग्णालयाविरुद्ध टीकेची झोड उठलेली असताना त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असून तिला नक्कीच न्याय मिळेल असं पाविना फाऊंडेशनने म्हटलं आहे. मात्र या प्रकरणामध्ये आरोग्य सेवांचं उत्तरदायित्व, रुग्णांचे अधिकार, रुग्णांची सुरक्षा यासारखे मुद्दे पुन्हा चर्चेत आल्याचं दिसत आहे.