मामाला बिर्याणीत मटणाचा तुकडा न मिळाल्याने लग्नमंडप पडेपर्यंत हाणामारी; पाहा Video

Wedding Fight Viral Video: या व्हिडीओला 3 लाख 42 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून घडलेला प्रकार पाहून अनेकांना हसू आलं आहे. मटणाच्या तुकड्यांवरुन लग्नामध्ये एवढा गोंधळ झाल्याचं पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 1, 2023, 09:15 AM IST
मामाला बिर्याणीत मटणाचा तुकडा न मिळाल्याने लग्नमंडप पडेपर्यंत हाणामारी; पाहा Video title=
एकमेकांना हाणामारी करता करता हे पुरुष महिलांसाठीच्या राखीव भागात शिरतात

Wedding Fight Viral Video: पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका लग्न सोहळ्यामध्ये बिर्याणीवरुन तुफान राडा झाला. बिर्याणीच्या मुद्द्यावरुन लग्नासाठी आलेल्या एका व्यक्तीने संपूर्ण कार्यक्रमाचाच बाजार उठवला. आपल्याला वाढण्यात आलेल्या बिर्याणीमध्ये मटणाचे पुरेसे तुकडे नसल्याचा दावा गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीने केला आहे. या संपूर्ण हाणामारी आणि गोंधळाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'एक्स'वर (ट्विटरवर) हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये लग्न समारंभामध्ये भोजनाचा कार्यक्रम सुरु असतानाच अचानक झालेला राडा दिसत आहे. जेवताना अचानक पुरुषांनी उठून एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. ही पुरुष मंडळी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारताना दिसत आहेत. 

काय दिसतंय व्हिडीओमध्ये?

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये लग्नसमारंभादरम्यानचं डायनिंग हॉलमधील दृष्य दिसत आहे. हॉलमध्ये पांढऱ्या रंगाचं कापड मधोमध लावून हॉलचे 2 भाग करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे पुरुष तर दुसरीकडे महिला बसल्याचं दिसत आहेत. पुरुष भोजन करत असलेल्या टेबलजवळ काही लोक येतात आणि भोजन करणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्यावरील टोपी उडवतात. त्यानंतर दोघे एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात करतात. व्हिडीओमध्ये पुढे या वादात आजूबाजूचे लोकही सहभागी होतात असं दिसत आहे. पाहता पाहता लग्नाच्या भोजन समारंभाच्या हॉलचं रुपांतर आखाड्यात होतं. सर्वजण एकमेकांना खुर्च्या, रॉड आणि कानाखाली मारत हाणामारीस सुरुवात करतात. 

एकमेकांना हाणामारी करता करता हे पुरुष या हॉलमधील पार्टिशनसाठी वापरण्यात आलेला पांढरा कपडाही पाडतात. हाणामारी करत हे महिलांसाठी राखीव भागात एकमेकांना वस्तू फेकत मारत शिरतात. हा वाद थांबवण्यासाठी नंतर महिलाच पुढाकार घेतात. 

अनेकांनी नोंदवल्या मजेदार प्रतिक्रिया

सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार लग्नासाठी आलेल्या मामाला त्याच्या बिर्याणीमध्ये मटणाचे तुकडे कमी संख्येने मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त करत जाब विचारल्याने हा राडा झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला 3 लाख 42 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 500 हून अधिक वेळा हा व्हिडीओ रिशेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने महिला आणि पुरुषांना वेगळं बसवल्याने मामा नाराज होते असं म्हटलं आहे. अन्य एकाने हा प्रकार पाकिस्तानमधील वाटतोय असं म्हटलं आहे. काहींनी जेवणात व्यग्र असलेली काही वयस्कर मंडळी आपल्या टेबलवरुनही उठली नसल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. या व्हायरल व्हिडीओची सत्यता Zee 24 Tass ने पडताळून पाहिलेली नाही.