Video Huge Snakes Fall Out Of Ceiling: जगभरामध्ये अनेक धोकादायक आणि महाकाय आकाराचे प्राणी कायमच चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा या प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी शिकारीचे तर कधी लोकांना केवळ प्राणी दिसल्याचे हे व्हिडीओ असतात. अनेकदा तर हे व्हिडीओ आणि त्यामधील प्राण्यांचा आकार पाहून धक्काच बसतो. असाच एखादा अंगाचा थरकाप उडवणारा प्राणी तुमच्या घरात शिकला तर काय कराल? अर्थात असं काही घडलं तर आधी भीतीमुळे काय करावं आणि काय नाही हेच तुम्हाला कळणार नाही. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छताला लटकलेली सापाची शेपटी बचावकार्य करणारी व्यक्ती खेचत असतानाच असं काही घडतं की लोक थक्क होऊन जातात.
ट्विटरवरील ओ टेरिफाइंग नावाच्या अकाऊंटवरुन असेच धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केले जातात. याच अकाऊंटवरुन नुकताच शेअर करण्यात आलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका घराच्या छताला भोक पाडून बाहेर आलेली सापाची शेपटी दिसत आहे. ही शेपटी खेचण्याचा प्रयत्न बचावकार्य करणारी व्यक्ती करते. हा साप बाहेर काढण्याच्या दृष्टीने ही व्यक्ती ती शेपटी पकडून खेचत असतानाच असं काही घडतं की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो.
व्हिडीओमध्ये छतामधून खाली आलेली शेपूट दिसत आहे. ही शेपूट सापाची असल्याचं दिसत आहे. या सापाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. साप पकडण्याच्या काठीने शेपूट पकडून सापाला खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. वारंवार प्रयत्न करुन शेपूट खेचत असतानाच या सापाच्या वजनाने संपूर्ण छत तुटतं आणि समोर जे घडतं ते पाहून सारेच थक्क होतात. मोठ्या आकाराचे चित्रपटांमध्ये दिसतात तसे महाकाय अजगर छतामधून खाली पडतात. दोन्ही अजगर एकमेकांना गुंडाळल्यासारखे दिसत असल्याने हे दोन अजगर आहेत की अधिक हे व्हिडीओमधून समजत नाही. मात्र हे अजगर दैत्यांहून कमी वाटत नाही. अजगर हे विषारी नसतात. मात्र त्यांची शिकारीची पकड आणि ताकद कोणत्याही प्राण्याचा जीव घेण्यास सक्षम असतात.
Snake gets stuck inside of a ceiling pic.twitter.com/W2mtuP4mbO
— OddIy Terrifying (@OTerrifying) February 14, 2023
न्यूज डॉट कॉम डॉट एयू या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार हा प्रकार मलेशियामध्ये घडला आहे. सापाची शेपटी दिसून आल्यानंतर या कुटुंबाने आपत्कालीन सेवेशी संपर्क साधून त्यांना मदतीसाठी बोलवलं होतं. हे अजगर छतावरुन खाली पडल्यानंतर ते पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करत असतानाच एका व्यक्तीने काठीने यापैकी एका अजगराला खेचलं आणि खोलीच्या बाहेर काढलं. हे एकूण तीन अजगर असल्याचं नंतर स्पष्ट झालं.