Beautiful Village Where No One Lives: शांतता, निसर्गरम्य वातावरण आणि निवांतपणा असलेल्या ठिकाणी राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. निसर्गाच्या सानिध्यात राहता यावं यासाठी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील लोक विकेण्ड आला की शहराबाहेर विकेण्ड आऊटींगसाठी फलतात. मात्र एक असं गाव आहे जिथे शहरातील लोकांना हव्या असणाऱ्या निसर्ग, निवांतपणा वगैरेसारख्या सर्व गोष्टी आहेत. समुद्र किनारे, डोंगर, टेकड्या असं सारं काही असूनही कोणालाही इथं राहण्याची इच्छा नाही. या गावातील सर्व लोक गाव सोडून निघून गेले आहेत. या गावातील 90 घरांमध्ये केवळ एक मुलगा राहतो. या मुलाला त्याचं गाव सोडून जायचं नाही त्यामुळेच तो हट्ट करुन या ठिकाणी राहिला आहे. संपूर्ण गाव रिकामं असून केवळ एक मुलगा इथं राहतो. मात्र यामागील कारणही फार खास आहे.
आता वरील परिच्छेद वाचून तुम्हाला या गावाला भूताने झपाटलं आहे की काय असं वाटू शकतं. भूताने झपाटल्याने या गावात लोकांना राहायचं नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. चोरी, डाके किंवा हत्येसारखे गुन्हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोक राहत नसतील असं वाटत असेल तर हा अंदाजही चुकीचा आहे. पोर्ट्लो नावचं हे गाव इंग्लंडमधील फार सुंदर ठिकाणी आहे. या ठिकाणी येण्याजाण्यासाठी उत्तम सोयी उपलब्ध आहेत. गावात पक्के रस्तेही बांधण्यात आले आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. दरवर्षी या गावाला हजारो पर्यटक भेट देतात. या गावात पर्यटक येऊन राहतात. समुद्रामध्ये मासेमारी करतात, समुद्रकिनाऱ्यांवर फिरतात. पण येथील स्थानिक मात्र गाव सोडून पळत आहेत.
'मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, या गावातील भाडं हे परवडण्यासारखं नाही. ज्या लोकांची या गावामध्ये घरं आहेत ते आधीच गाव सोडून निघून गेले आहेत. ही घरं आता पर्यटकांना भाड्याने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मात्र या घरांमध्ये कोणालाही कायम स्वरुपी राहण्याची इच्छा नाही. स्थानिक प्रॉपर्टी रेटनुसार येथे भाडं आकारलं जात असल्याने या घरांसाठी भाडेकरु मिळत नाहीत. या घरांचं जेवढं भाडं आहे तेवढ्या भाड्यामध्ये शहरात सहज घर उपलब्ध होतं. त्यामुळे या घरांमध्ये तत्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी पर्यटक येतात आणि भरपूर पैसे देऊ या घरांमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वीच पॅरिश काऊन्सिलचे अध्यश्रक्ष ल्यूक डनस्टोन यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. ही जागा स्वर्गासारखी वाटते. या जागेचं संवर्धन केलं पाहिजे. ही जागा हातची निघून जावी अशी आमची इच्छा नसल्याने या ठिकाणाबद्दल अधिक जागृक राहण्याची गरज आहे, असं डनस्टोन म्हणालेत.
खरं तर या ठिकाणी असलेली घरं कोणी विकतही घेत नाही. कारण येथील 2 बेडरुमच्या कॉटेजची किंमत 4.5 कोटी रुपयांहून अधिक आहे. 3 बेडरुमच्या कॉटेजची किंमत 8.5 कोटींच्या आसपास आहे. एवढ्या किंमतीत शहरांमध्ये मोठ्या आकाराची घरं उपलब्ध आहेत. डनस्टोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात काम केलं पाहिजे. असं झालं तरच लोक इथं येतील. स्वर्गासारख्या दिसणाऱ्या या गावाचं नर्क होईल. असं व्हायला नको यासाठीच परवडणारी घरं इथं उपलब्ध करुन द्यायला हवीत, असं डनस्टोन यांचं म्हणणं आहे.