अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; 22 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

अमेरिकेतील लेविस्टन येथे झालेल्या गोळीबारात 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घडली आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 26, 2023, 07:55 AM IST
अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; 22 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता title=

lewiston Mass Shooting : अंधाधुंद गोळीबाराच्या घटनेनं अमेरिका (America) पुन्हा एकदा हादरली आहे. अमेरिकेतील लेविस्टन (lewiston) शहरात एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. या गोळीबारात अनेक जण गंभीर जखमी झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शूटरने बुधवारी रात्री हा गोळीबार केला. अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयाने संशयिताचे दोन फोटो शेअर केले आहेत.

अँड्रॉस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, यातील संशयित अद्याप फरार आहे. आम्ही तपास करत असताना आम्ही सर्व व्यवसाय बंद करण्यास सांगत आहोत. ओळख पटवण्यासाठी संशयिताचे फोटो जारी केले आहेत. संशयिताकडे हाय पॉवरची असॉल्ट रायफल आहे.

पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो प्रसिद्ध करुन लोकांकडून मदत मागितली आहे. फोटोमध्ये, लांब शर्ट आणि जीन्स घातलेला एक दाढीवाला माणूस रायफल धरून गोळीबार करताना दिसत आहे. लेविस्टन येथील सेंट्रल मेन मेडिकल सेंटरने एक निवेदन जारी करून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे म्हटले आहे. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यासोबत स्थानिक पोलिसांनीही नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत.  'कृपया तुमच्या घरात दरवाजे बंद करून रहा. तुम्हाला कोणतीही संशयास्पद कृती किंवा व्यक्ती दिसल्यास कृपया 911 वर कॉल करा,' असे पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिक पोलीस मॉलिसन वे, स्पार्टटाइम रिक्रिएशन आणि लिंकन स्ट्रीटवरील स्कीमेन्जेस बार आणि ग्रिल रेस्टॉरंटमधील परिस्थिती हाताळत आहेत. 

लुईस्टनमध्ये तीन ठिकाणी गोळीबार

द सन जर्नलने लुईस्टन पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, स्पेअरटाइम रिक्रिएशन, स्केमेन्झीचे बार अँड ग्रिल रेस्टॉरंट आणि वॉलमार्ट वितरण केंद्रासह तीन स्वतंत्र ठिकाणी गोळीबार करण्यात आला. वॉशिंग्टनमधील एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या गोळीबाराच्या घटनेची माहिती देण्यात आली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

2022 नंतर सर्वात मोठी घटना

गन वायलेन्स आर्काइव्हनुसार, मे 2022 नंतर अमेरिकेतील ही सर्वात मोठी गोळीबाराची घटना आहे. मे 2022 मध्ये, टेक्सासमधील उवाल्डे येथील एका शाळेत एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला होता. ज्यात 19 मुले आणि दोन शिक्षक मारले गेले होते. 2020 मध्ये कोविड-19 सुरू झाल्यापासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. 2022 मध्ये अशा 647 घटना घडल्या आणि 2023 मध्ये आतापर्यंत 679 घटना घडल्याचे समोर आलं आहे.