US Presidential Election 2024: ...तर भारतीय वंशाची 'ही' महिला अमेरिकेची राष्ट्रध्यक्ष होणार; ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं

US presidential election 2024 Indian American could launch campaign: ट्रम्प यांनी मागील वर्षीच आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे असं जाहीर केलं होतं. मात्र आता त्यांना त्यांच्याच पक्षातून आव्हान मिळण्याची शक्यात आहे.

Updated: Feb 2, 2023, 04:32 PM IST
US Presidential Election 2024: ...तर भारतीय वंशाची 'ही' महिला अमेरिकेची राष्ट्रध्यक्ष होणार; ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं title=
Nikki Haley US President Election

Nikki Haley Could Launch Campaign For Republican Nomination: भारतीय वंशाच्या अमेरिकी रिपब्लिकन नेत्या निक्की हेली (Nikki Haley) सध्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासंदर्भातील नियोजन करत आहेत. 15 फेब्रुवारी रोजी 2024 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये सहभागी होत असल्याची घोषणा करु शकतात अशी चर्चा अमेरिकन राजकीय क्षेत्रात आहे. असं झाल्यास त्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना आव्हान देणाऱ्या पक्षातील (Republican Nomination) पहिल्या नेत्या ठरतील. 51 वर्षीय हेली या दोन वेळा दक्षिण कॅरोलॉनाच्या गव्हर्नर राहिल्या आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणूनही काम पाहिलं आहे.

ट्रम्प यांनी मागील वर्षीच केली घोषणा

हेली यांनी आपली उमेदवारीसाठी दावेदारी सांगितली तर आपले आधीचे बॉस म्हणजेच ट्रम्प यांना त्यांच्यात पक्षातून थेट विरोध करणाऱ्या त्या पहिल्या नेत्या ठरतील. सध्या ट्रम्प हे आपल्या पक्षाकडून 2024 साली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी दावेदारी सादर करणारे एकमात्र रिपब्लिकन नेते आहेत. 76 वर्षीय ट्रम्प यांनी मागच्या वर्षीच आपण पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं.

निमंत्रण पाठवण्यात आलं

'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार हेली या आठवड्यामध्ये लवकरात लवकर आपल्या योजनांसंदर्भातील कल्पना देणारा एका व्हिडीओ जारी करणार आहेत. 'द पोस्ट अ‍ॅण्ड कुरियर'ने दिलेल्या वृत्तानुसार या माजी गव्हर्नरच्या समर्थकांना 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष घोषणेसंदर्भातील कार्यक्रमाची निमंत्रणं मिळाली आहेत. हा कार्यक्रम 'चार्ल्सटन व्हिजिटर्स सेंटर'च्या 'द शेड'मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शेकडोच्या संख्येनं हेली यांचे समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

31 जानेवारीला घेतली बैठक

दक्षिण कॅरोलॉनामधील 'द चार्ल्सटन'ने दिलेल्या वृ्त्तामध्ये '31 जानेवारी रोजी हेली यांनी आपल्या निकटवर्तीयांची यासंदर्भात चर्चा केली. यासंदर्भातील ठोस माहिती उपलब्ध असून त्या या शर्यतीमध्ये (राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये) सहभागी होणार आहेत,' असं म्हटलं आहे.

हेली यांचं सूचक विधान

हेली यांनी यापूर्वी एका भाषणामध्ये ट्रम्प पुन्हा निवडणूक लढणार असतील तर आपण त्यांना आव्हान देणार नाही असं म्हटलं होतं. मात्र आता हेली यांची भूमिका बदलल्याचं चित्र दिसत आहे. अमेरिकेला एका वेगळ्या दिशेने पाहण्याची गरज असल्याचं हेली यांनी म्हटलं आहे. नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये हेली यांनी, 'हा नव्या पिढीचा काळ आहे,' असं सूचक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचे बरेच अर्थ काढले जात आहे. 2024 साली अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाची निवडणुक होणार आहे. 

पहिल्या भारतीय वंशाच्या राष्ट्राध्यक्ष

हेली ही निवडणूक लढल्या आणि जिंकल्या तर त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा ठरण्याबरोबरच अमेरिकेच्याही पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. सध्या उपराष्ट्राध्यपदी असलेल्या कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्षा ठरल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. सुनक यांच्या माध्यमातून ब्रिटनला पहिल्यांदाच भारतीय वंशांची व्यक्ती पंतप्रधान म्हणून मिळाली.