'पत्रकार परिषद वेळ फुकट घालवण्याचं काम', ट्रम्प मीडियावर भडकले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तिथल्या मीडियावर चांगलेच संतापले आहेत.

Updated: Apr 26, 2020, 07:58 PM IST
'पत्रकार परिषद वेळ फुकट घालवण्याचं काम', ट्रम्प मीडियावर भडकले title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तिथल्या मीडियावर चांगलेच संतापले आहेत. कोरोना व्हायरसबाबत मी घेत असलेल्या नियमित पत्रकार परिषदा वेळ आणि प्रयत्न फुकट घालवण्याचं काम आहे, कारण पारंपारिक मीडिया फक्त प्रतिकूल प्रश्नच विचारतात, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

कोरोना व्हायरसला मारण्यासाठी जंतूनाशक असलेलं इंजक्शन रुग्णाला देऊ शकतो, असं वक्तव्य ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या वक्तव्यानंतर ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली होती. ट्रम्प यांचा हा धोकादायक सल्ला ऐकू नका, असं अमेरिकेतल्या तज्ज्ञांना सांगावं लागलं.

एक महिन्यापेक्षा जास्त काळ पत्रकार परिषदा घेतल्यानंतर शनिवारी ट्रम्प नियमीत पत्रकार परिषदेसाठी आले नाहीत. व्हाईट हाऊसमधला पत्रकार परिषदांचा कार्यक्रम रद्द करण्याचे संकेतही ट्रम्प यांनी दिले होते. पत्रकार परिषदा रद्द करण्याचा विचार करत असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. यानंतर ४५ मिनिटांमध्येच ट्रम्प यांनी ट्विट करुन मीडियावर टीका केली.

'जर पारंपारिक मीडिया फक्त प्रतिकूल प्रश्न करत असेल आणि सत्य दाखवायला आणि तथ्य समोर ठेवायला नकार देत असेल तर, व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदांना अर्थ काय? त्यांना चांगलं रेटिंग मिळतं आणि अमेरिकेच्या लोकांना खोट्या बातम्या', असं ट्विट ट्रम्प यांनी केलं.

घरात वापरल्या जाणारी जंतूनाशक इंजक्शनमध्ये घालून कोरोनाच्या रुग्णांना द्यायचा सल्ला ट्रम्प यांनी दिला. या सल्ल्यावर टीका झाल्यानंतर ट्रम्प यांनी सारवासारव केली. ते वक्तव्य मस्करीमध्ये केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

ट्रम्प यांच्या या सल्ल्यावर तज्ज्ञ आणि जंतूनाशक बनवणाऱ्या कंपन्यांनी जोरदार टीका केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये जंतूनाशकांचा शरिरात प्रवेश करता कामा नये, असं अन्न आणि औषध प्रशासनाचे माजी प्रमुख स्कॉच गोटिलेब यांनी सांगितलं. तर लायझॉल बनवणाऱ्या कंपनीला आपल्या उत्पादनांचं सेवन करू नका, असं आवाहन ग्राहकांना करावं लागलं.