ट्रम्प हादरले; पुढच्या १५ दिवसांत अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक बळी जाणार

आतापर्यंत १,४१,००० अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

Updated: Mar 30, 2020, 02:53 PM IST
ट्रम्प हादरले; पुढच्या १५ दिवसांत अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक बळी जाणार title=

वॉशिंग्टन: एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाच्या सावटाखाली असणारी अमेरिका रुळावर आणू, असा दावा करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. कारण, अमेरिकन सरकारच्या वरिष्ठ वैद्यकीय सल्लागारांनी कोरोनामुळे देशातील १ लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तविली आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये हे प्रमाण सर्वोच्च पातळीवर पोहोचेल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी येत्या ३० एप्रिलपर्यंत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना मुदतवाढ दिली आहे. 

यापूर्वी ट्रम्प यांनी १२ एप्रिल म्हणजे ईस्टर डेपर्यंत अमेरिकेत सर्वकाही सुरळीत झालेले असेल, असा दावा केला होता. युरोपमध्ये कोरोना थैमान घालत असतानाही अमेरिकेत लॉकडाऊनची घोषणा का केली जात नाही, असा प्रश्न विचारला जात होता. परंतु, ट्रम्प यांनी अमेरिकेत सर्वकाही सुरळीत होईल, या आशेने देश लॉकडाऊन करणे टाळले होते. 

मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत १,४१,००० अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. तर आतापर्यंत २४६० अमेरिकन नागरिकांनी आपला जीवही गमावला आहे. 

मात्र, येत्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक वेगाने लोकांचा मृत्यू होईल, अशी शक्यता वैद्यकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाला आता खडबडून जाग आली आहे. अमेरिकन लोक जितक्या संयमाने वागतील तेवढी कोरोनाच्या बळींची संख्या कमी होईल, असे ट्रम्प यांनी सांगितले. 

मात्र, तरीही अमेरिकेत कोरोनामुळे एक लाख लोकांचा मृत्यू होईल, असा वैद्यकीय जाणकारांचा अंदाज आहे. हे प्रमाण लाखभरापर्यंत आटोक्यात ठेवले तर अमेरिका कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरली, असे मानले जाईल. अन्यथा मृतांचा आकडा दोन लाखांपेक्षा पुढे जाईल, अशी भीतीही या जाणकारांकडून वर्तविण्यात आली आहे.