इस्लामाबाद : पाकिस्तानमधली कायम चर्चेत आणि वादात असलेली टिकटॉक स्टार हरीम शाहने पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेख रशीद आपल्याला अश्लिल व्हिडिओ पाठवायचे, असा खळबळजनक दावा हरीम शाहने केला आहे. ट्विटरवर हरीम शाहने याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केला, पण वाद झाल्यानंतर तिने हा व्हिडिओ डिलीट केला.
हरीम शाहने गुरुवारी मंत्री शेख रशीद आणि तिच्यातला एक व्हिडिओ कॉल ट्विटरवर टाकला होता. या व्हिडिओमध्ये रशीद यांच्याशी बोलताना हरीमने अश्लिल व्हिडिओबाबत भाष्यं केलं.
या व्हिडिओ कॉलमध्ये हरीम रशीदना म्हणाली, 'माझं ऐका, मी आजपर्यंत तुमची एखादी गोष्ट सांगितली आहे का? मग तुम्ही हल्ली माझ्याशी बोलत का नाही?' यावर प्रतिक्रिया देताना रशीद म्हणाले, 'जे करायचं ते कर.'
रशीद यांच्या या वक्तव्यावर हरीमने प्रतिक्रिया दिली. 'तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तुम्ही मला जे न्यूड व्हिडिओ पाठवलेत त्याचं काय? तुम्ही ते ही विसरलात का?' असे सवाल हरीमने या व्हिडिओ कॉलमध्ये रशीदना विचारले. हरीमने वाद घालायला सुरुवात केल्यानंतर रशीदनी व्हिडिओ कॉल कट केला.
हरीम शाहने हाच व्हिडिओ शेयर केला होता. पण काही कालावधीनंतर तिने हा व्हिडिओ डिलीट केला, पण हा व्हिडिओ आधीच व्हायरल झाला होता. या प्रकरणावर हरीम शाहने प्रतिक्रिया दिली आहे. कोणाची इज्जत घालवणं हे माझं नाही तुम्हा लोकांचं काम आहे. माझ्याकडे एवढा वेळही नाही, असं हरीम म्हणाली आहे. याआधाही हरीम शाह आणि शेख रशीद यांचा एक सेल्फी व्हायरल झाला होता.